संत्र्याची झाडे सुकल्याने बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:38 PM2019-06-13T18:38:11+5:302019-06-13T18:38:38+5:30
पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
अमरावती - पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
अनिल नामदेव कडू (४९, रा. लोणी) असे आत्महत्या करणा-या संत्राबागायतदाराचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, त्यांच्याकडे मेंढीखेडा, सावंगा आणि हसापूर शिवारात नऊ एकर जमिनीवर फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत. यावर्षी झाडांवर आंबिया बहर मोठ्या प्रमाणावर फुटला होता. तथापि, यावर्षीच्या अल्पशा पर्जन्यमानामुळे भूजल पातळी घटल्याने विहिरी आटल्या. संत्राझाडे जगविण्याकरिता जिवाचा आटापिटा करूनही अपयश आले.
यामुळे बहर झडलाच, शिवाय संत्रा झाडे सुकत चालली आहेत. सदर शेतक-याचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला होता. गुरुवारी सकाळी ७ वाजता आलोडा रस्त्यावरील शेतातील गाठ्यात असलेल्या गायीचे दूध काढून त्यांनी डेअरीवर पोहचविले. यानंतर याच शेतात झिंक फॉस्फेट हे विषारी औषध घेतले. त्यानंतर लोणी-आलोडा मार्गातील शेतातील गोठ्यात गळफास घेतला. त्यांच्या पश्चात म्हातारे आई-वडील, बहीण, पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
बेनोडाचे ठाणेदार सुनील पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहेत.