धक्कादायक वास्तव! ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 10:59 AM2022-04-26T10:59:44+5:302022-04-26T11:08:44+5:30
यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.
गजानन मोहोड
अमरावती : पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच ९० दिवसांत तब्बल २७९ शेतकरी आत्महत्या झाल्याचा विभागीय उपायुक्तांचा अहवाल शासनाला सादर झालेला आहे. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे वास्तव आहे. यामध्ये सर्वाधिक ८० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत.
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा, आजारपण, कर्जासाठी तगादा आदी कारो शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कसे करावे, उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत, शेतकरी मृत्यूचा फास आवळत आहेत. मागील वर्षी विभवगवत १,१७३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना दिल्यात. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही, अलीकडे पाऊसही बिनभरवशाचा झालेला आहे. कधी अतिपावसाने, तर कधी पावसाच्या अभावामुळे हातातोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या विंवचनेत भर पडत आहे.
सन २००१ पासून १७,९३८ शेतकरी आत्महत्या
पश्चिम विदर्भात सन २००१ पासून महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यत तब्बल १७,९३८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी फक्त ८,१६६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आलेली आहे. तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त ९,५३५ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत. २३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय स्थिती
पश्चिम विदर्भात यंदा मार्चअखेर २७९ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये सर्वाधिक ८० आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील, अकोला जिल्ह्यात २९, यवतमाळ जिल्ह्यात ६९, बुलडाणा जिल्ह्यात ६१ व वाशिम जिल्ह्यात ४० आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. ५५ प्रकरणे अपात्र, तर १६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.