शेतकऱ्यांना १६ मेपासून बीटी बियाणे विक्रीसाठी परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:30 PM2024-05-08T12:30:45+5:302024-05-08T12:32:48+5:30

Amravati : कृषी विभागाने काढला अध्यादेश, प्रशासनाचे नियोजन, फरफट थांबणार

Farmers allowed to sell BT seeds from May 16 | शेतकऱ्यांना १६ मेपासून बीटी बियाणे विक्रीसाठी परवानगी

Farmers allowed to sell BT seeds from May 16

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार :
गतवर्षी कृषी विभागाने बीटी कापूस बियाणे १ जूनला विक्री करण्याचा अध्यादेश मागे घेऊन यंदा १६ मेपासून कपाशी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची फरपट बंद होईल. कृषी विभागाने त्याकरिता मुभा दिली आहे. गतवर्षी बोंडअळीच्या धसक्याने बीटी बियाणे मान्सूनपूर्व लागवडीच्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्रधारकांना १ जूनपूर्वी विक्रीस मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी बियाणे १ जूनपूर्वी खरेदी केले होते. यात अनेक शेतकऱ्यांची फसगत झाली. तसेच राज्यातील विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला होता. 

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व इतर ठिकाणाहून बियाणे खरेदीसाठी फरपट होऊ नये, हे लक्षात घेता महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड डीलर असोसिएशन (माफदा) पुणे यांनी हा मुद्दा कृषी आयुक्तालय (पुणे) यांच्याकडे लावून धरला होता. संघटनेच्या या प्रस्तावाला कृषी आयुक्तालयाने परवानगी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रधारकांना आता १५ मेपासून बीटी कापूस बियाणे विक्रीकरिता येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेपूर्वी बियाणे खरेदी करण्याचे नियोजन करता येणार आहे.


कृषी सेवा केंद्रात बियाणे उपलब्ध होणार असल्याने वेळेवर होणारी धावपळ थांबणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व विक्रेत्यांना बियाणे विक्रीचे नियोजन करता येईल. कृषी आयुक्त यांचा निर्णय चांगला आहे.
- सुहास ठाकरे, कृषी निविष्ठा विक्रेता

खरीप हंगामात कपाशी बियाणे खरेदीचे नियोजन शेतकरी १५ दिवस अगोदर करण्यास, तसेच मान्सूनपूर्व लागवडीस शेतकऱ्यांना सवड मिळेल. बीटी बियाणे पाकिटाची किंमत शासनाने कमी करावी, जेणेकरून उत्पादनखर्चात बचत
होईल.

- मुन्ना चांडक, शेतीनिष्ठ शेतकरी, राजुराबाजार

शेतकऱ्यांना बियाणे खरेदी १६ मे पासून करता येईल, परंतु पेरणी १ जूननंतरच करावी. शासनाचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितार्थ आहे. कृषिसेवा केंद्र संचालकांनी वरील बाबी स्पष्टपणे शेतकऱ्यांना समजावून सांगाव्या.
राजकुमार सावळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती

 

Web Title: Farmers allowed to sell BT seeds from May 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.