कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज !
By Admin | Published: June 2, 2017 12:10 AM2017-06-02T00:10:54+5:302017-06-02T00:10:54+5:30
जिल्ह्यातील शेतकरी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मी कर्जमुक्त
अर्ज प्रक्रिया सुरू : ‘मी कर्जमुक्त होणारच’ सेनेचे अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील शेतकरी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मी कर्जमुक्त होणारच! अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत आहेत. हे अर्ज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. शिवसेना शाखा ते जिल्ह्यातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहीजे तसा भाव नाही. शेतकऱ्याने यावर्षी तूर पेरली मात्र तुरीलाही पाहीजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय कुठे पाऊस आहे कुठे नाही, कुठे गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी अर्ज घेऊन शेती करतो मात्र शेतीतही पाहीजे तसे पिकत नाही. कर्जमुक्तीसाठी बँकेची पठाणी वसुली सुरु आहे. त्यांना जप्तीच्या नोटीस दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मी कर्जमुक्त होणारच! अशा आशयाचे अर्ज जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत असून शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी हे अर्ज भरून घ्यावे असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहितीकरिता शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडे संपर्क करून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभावी व्हावे. सदर अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड यांनी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही शासन मात्र कर्जमाफी देत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पक्षाच्यावतीे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पदाधिकारी म्हणाले.