विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरीही झाला लाडका; २.७२ लाख खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:36 AM2024-08-26T11:36:53+5:302024-08-26T11:40:54+5:30

' नमो'चा चौथा हप्ता : आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ

Farmers are also beloved; 2.72 lakhs account with each two thousand deposits | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरीही झाला लाडका; २.७२ लाख खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा

Farmers are also beloved; 2.72 lakhs account with each two thousand deposits

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी लाडका झालेला आहे. पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याला महिना उलटत नाही तोच बुधवारी राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान योजने'चा चौथा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आला. जिल्ह्यात ई- केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या २,७२,१९८ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक दोन हजार रुपये जमा होत आहेत. 


बीड जिल्ह्यातील परळी येथे बुधवारपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव साजरा केल्या जात आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राज्य शासनाच्या 'नमो' योजनेचा चौथा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी मंगळवारी केली होती. या योजनेचे आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाद्वारा 'नमो शेतकरी महासन्मान योजने'द्वारे शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या 'पीएम किसान सन्मान' योजनेचा डेटा वापरण्यात येत आहे.


लाभ मिळणारे तालुकानिहाय खातेदार 
कृषी विभागाच्या माहितीनुसार, अचलपूर तालुक्यात २२,१८३, अमरावती १६,२७९, अंजनगाव सुर्जी १९,२४५, भातकुली १५,९९१, चांदूर रेल्वे १३,८७९, चांदूरबाजार २६,३३२, चिखलदरा १०,४८६, दर्यापूर २४,१२२, धामणगाव १७,९६६, धारणी १६,३१०, मोर्शी २५,०५२, नांदगाव खंडेश्वर २२,८०५, तिवसा १५,०६४ व वरूड तालुक्यात २६,४८४ शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.


२६२ खातेदारांनी सोडला योजनेचा लाभ 
'नमो शेतकरी महासन्मान योजने'मध्ये पात्र असलेल्या २६२ शेतकरी खातेदारांनी या योजनेचा लाभ सोडला आहे, तसे पत्र यापूर्वी प्रशासनाला दिले आहे. यापैकी बहुतेक खातेदार हे लाभाच्या पदावर आहेत, तर काही सधन कास्तकार आहेत. पीएम किसान योजनेचा डेटा वापरण्यात आल्याने काही आयकरदात्या शेतकऱ्यांची नावे या योजनेत समाविष्ट झाली होती.

Web Title: Farmers are also beloved; 2.72 lakhs account with each two thousand deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.