शेतकरीच बनले लाईनमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:50+5:302021-04-20T04:12:50+5:30
सिंचनाचा प्रश्न फोटो पी १८ चांदूर बाजार चांदूर बाजार : सध्या तालुक्यातील सिंचनाची व्यवस्था असलेल्या गावांमध्ये उन्हाळी पीक घेण्यात ...
सिंचनाचा प्रश्न
फोटो पी १८ चांदूर बाजार
चांदूर बाजार : सध्या तालुक्यातील सिंचनाची व्यवस्था असलेल्या गावांमध्ये उन्हाळी पीक घेण्यात येत आहे. लखलखत्या उन्हामुळे या पिकांना पाण्याची नितांत गरज असते. मात्र, विद्युत पुरवठ्यात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचनात खंड पडत आहे. एकाच लाईनमनकडे अनेक गावांचा प्रभार असल्यामुळे शेतकऱ्यांनाच लाईनमन बनून रोहित्रचे बॉक्स हाताळावे लागत आहेत. प्रसंगी घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुका कृषिप्रधान असून, सिंचनाची मुबलक व्यवस्था असल्याने तालुक्यात विविध प्रकारची पिके घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे कृषिक्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शासकीय स्तरावरून सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषिपंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, एकाच लाईनमनकडे पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रांसफाॅर्मरचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होतं आहे. विद्युत वाहिनीत जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच होते. त्यामुळे सिंचन सुविधा प्रभावी होत आहे. रोहित्र बॉक्समधील फ्यूज गेल्यास वायरमन कधी येईल आणि कधी शेतकरी सिंचन करेल? यामुळे गरजेच्या वेळी रोहित्राचा बॉक्स शेतकरीच उघडून फ्यूज टाकणे, कार्बन आल्यास साफ करणे अशी अनेक कामे शेतकऱ्यांना स्वतः करावी लागतात.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी विद्युत पुरवठा हा रात्री असल्याने लाईनमन वेळेवर कधीच उपलब्ध होत नाही. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना खुले रोहित्रे हाताळावे लागतात. या खुल्या रोहित्रामुळे जिवावर उदार होऊन वेळीच फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते. या रोहित्राचे तुटलेले दरवाजे नेहमीच उघडे राहतात. अनेकदा येथील विद्युत जोडणीसुद्धा उघडी असते. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील वेळेवर लाईनमन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनाच जीव मुठीत धरून सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा लागतो.
केवळ सिंचनासाठी
शेतकऱ्यांना फ्यूज बदलण्यासाठी कोणतेच प्रशिक्षण नाही. त्यामुळे सुरक्षा सुविधांची फारशी जाणीव नसते. अशावेळी घातपात झाल्यास मोबदला मिळत नाही. केवळ सिंचन व्यवस्था सुरळीत राहावी, या अनुषंगाने शेतकरी जिवावर उदार होऊन महावितरण कंपनीचे कार्य चोखपणे बजावत आहे. अशात अनेकदा शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावा लागतो. महावितरण दरवर्षी मेंटेनन्सचा नावावर लाखो रुपयांची देयके काढतात. मात्र, शेतात असेलेल्या रोहित्र दुरुस्तीबाबत महावितरण विभाग नेहमीच उदासीन असतो. दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही शेतात मोठ्या प्रमाणात उघड्या असलेल्या विद्युत वाहिन्या, रोहित्र अद्यापही कायम आहेत. त्यामुळे महावितरण कंपनी मेंटेनन्स केवळ कागदावरच करीत असल्याचे शेतकरी वर्गातर्फे बोलले जात आहे.