वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांचा डेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:56 PM2018-08-24T21:56:15+5:302018-08-24T21:56:32+5:30
शेतातील उभे पीक नष्ट करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जीवघेण्या त्रासापासून संरक्षण करा, या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी डेरा आंदोलन केले. येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक देत वन्यप्राण्यांच्या हैदोसाचे वास्तव या शेतकऱ्यांनी मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतातील उभे पीक नष्ट करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जीवघेण्या त्रासापासून संरक्षण करा, या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी डेरा आंदोलन केले. येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक देत वन्यप्राण्यांच्या हैदोसाचे वास्तव या शेतकऱ्यांनी मांडले.
पीक संरक्षण समितीच्यावतीने नेरपिंगळाई भागातील वन्यप्राणिग्रस्त शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयावर केलेल्या डेरा आंदोलनामुळे वनविभागासह पोलिसांची तारांबळ उडाली. जिल्हा कचेरीकडे जाणारा मार्ग एका बाजूनेच सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना उशिरा सायंकाळपर्यंत या मार्गानेच ये-जा करावी लागली.
दरम्यान, डेरा आंदोलनाद्वारे वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली. वनक्षेत्राला तारेचे कुंपण करावे, अन्यथा शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर संरक्षण कुंपण द्यावे. वन्यप्राण्यांकडून नुकसानाचा समावेश पीक विम्यामध्ये करण्यात यावा. हरीण, रानडुक्कर, रोही आदी पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा वनसीमेतच बंदोबस्त करण्यात यावा. नुकसानाची १०० टक्के रक्कम देण्यात यावी. संत्रा कलमांना प्रतिलाख अडीच लाख, तर सोयाबीन, तूर, कपाशी पिकांकरिता प्रतिहेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. नुकसानभरपाई दाव्यातील अट रद्द करावी. नुकसानभरपाईची रक्कम १० दिवसांत अदा करावी, अशा विविध मागण्या यावेळी शेतकºयांनी मांडल्या.
डेरा आंदोलन संजय मोहोकार, महेबुब दौला, साजीद पठाण, राहुल मंगळे, अरुण देशमुख, अफसर पठाण, नीलगश मंगळे, नीलेश मेहरे, उद्ववराव गणोरकर यांच्यासह नेरपिंगळाई व परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
या गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी
डेरा आंदोलनात नेरपिंगळाईसह आखदवाडा, लिहिदा, पिंपळखुटा, पार्डी, भांबोरा, राजूरवाडी, कमळापूर, शिळरस, धानोरा, सार्सी, जामडोल, नांदोरा, गोराळा, सावरखेड, लेहेगाव, काटपूर, वाघोली, शिरखेड येथील त्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.