हरभरा नोंदणीकरिता खरेदीविक्री संघासमोर शेतकऱ्यांची गर्दी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:31 PM2023-02-27T18:31:51+5:302023-02-27T18:33:06+5:30
प्रक्रिया सुरू होईपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांकडून होत असल्याने खरेदी विक्री कडून ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली
संजय जेवडे
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : नांदगाव खंडेश्वर येथे शासनाकडून हरभरा खरेदी करिता नाफेडमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याच्या माहितीवरून खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासमोर 26 फेब्रुवारीच्या रात्री साडेदहा वाजतापासून गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये 27 फेब्रुवारी रोजी सकाळी हजारो शेतकरी नाफेडच्या नोंदणी प्रक्रिया करता खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर जमा झाले. परंतु शासनाकडून कुठलाही आदेश नाही, अशी माहिती खरेदीर संघाच्या सचिवाकडून देण्यात आली. त्यानंतरही कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. प्रक्रिया सुरू होईपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांकडून होत असल्याने खरेदी विक्री कडून ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. परंतु शेतकऱ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे शेतकऱ्याची गर्दी नियंत्रण आणण्याकरिता पोलिसांकडून शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर शांततेत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.
शासनाकडून नाफेड मार्फत हमीभावानुसार हरभरा खरेदी करिता नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची कुठलीही आदेश नसताना अचानक झालेल्या माहितीवरून नांदगाव खंडेश्वर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयासमोर ऑनलाईन नोंदणी करिता हजारो शेतकरी जमा झाले. परंतु आम्हाला नोंदणी प्रक्रियेचा कुठलाही आदेश नसून आम्ही नोंदणी प्रक्रिया सुरू करू शकत नाही, अशी माहिती खरेदी विक्री संघाचे सचिव अमोल खंडारे यांनी दिल्यानंतरही शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले. गर्दीत असलेला आक्रोश बघता येथे खरेदी संघाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. तेव्हा जोपर्यंत खरेदी करणार नाही आम्ही घरी जाणार नाही, असे नारे शेतकरी देत होते.
उपस्थित गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता सचिव यांनी ठाणेदार यांना फोन करून बोलावले व यानंतरही गर्दी कमी होण्याचे नाव घेत असल्याने ठाणेदार विशाल पोळकर व यांच्या मध्यस्थीने ऑफलाइन नोंदणी प्रक्रियेला खरेदी विक्री संघाकडून सुरुवात करण्यात आली. तर यामुळे नोंदणी प्रक्रियेत रांगेत होत असलेली धक्काबुक्की थांबवण्याकरिता व योग्यरीता नोंदणी प्रक्रिया सुरू राहण्याकरिता व गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांकडून शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर ही नोंदणी प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने चार चार खिडक्यांमध्ये शांततेत पार पडली यामध्ये यामध्ये दुपारी पाच वाजेपर्यंत सुमारे २१०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खरेदी विक्रीच्या कार्यालयासमोर गर्दी केल्याने वरिष्ठ स्तरावरून लेखी आदेश नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश टाळण्याकरिता शेतकऱ्यांना टोकन प्रमाणे अर्ज स्वीकारले व सध्या स्थितीत आदेश प्राप्त नसल्याने आदेश प्राप्त होतात ऑनलाईन नोंदणी केल्या जाईल.
- अमोल खंडार, सचिव खरेदी विक्री.
नाफेडच्या हरभरा नोंदणी प्रक्रिया करिता मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असल्याने महिलांकरिता येथे वेगळी काउंटर सुरू करून यांच्या कडून नोंदणी करण्यात आली. हरभऱ्याचे खासगी भाव कमी असल्याने नाफेडच्या खरेदीमध्ये जवळपास सातशे ते आठशे रुपयाचा फरक असल्याने शासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या नाफेडची नोंदणी सुरू झाली अशी माहिती मिळाल्याने नोंदणी करण्याकरिता नांदगाव खंडेश्वर येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये शेतकरी आले असता येथे माहिती मिळाली की अद्यापही नोंदणी प्रक्रिया सुरू व्हायची आहे परंतु येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले गेले. असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी नाफेडच्या हरभरा नोंदणी प्रक्रिया करिता मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असल्याने महिलांकरिता येथे वेगळी काउंटर सुरू करून यांच्याकडून नोंदणी करण्यात आली.