बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
By admin | Published: June 18, 2015 12:32 AM2015-06-18T00:32:58+5:302015-06-18T00:32:58+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची...
पेरणीला वेग : उच्च प्रतीकडे कल
भंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा कल उच्च प्रतीच्या बियाण्यांकडे असल्याचे कृषी केंद्रावर होत असलेल्या गर्दीवरुन दिसते.
धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला प्रारंभ करतो. धानाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उच्च प्रतीच्या धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येते. उच्च प्रतीच्या बियाणांमध्ये खजाना वाय एस आर, सुपर सोना, केशर, श्री १००८ चा समावेश आहे. त्याची किंमत क्रमश: ५८० रुपये (१० किलो), याचप्रमाणे सुपर सोना ६३० रुपये (१० किलो), केशर ६५० रुपये (१० किलो) आणि श्री १००८ -६३० रुपये (१० किलो) सांगण्यात आली. याचबरोबर अन्य बियाण्यांमध्ये पी के वी (एचएमटी) ७५० रुपये (२५ किलो), सुवर्णा ७३० रुपये (२५ किलो), एम टी यू १०१० -६८० रुपये (२५ किलो), श्रीराम ५०० रुपये (१०किलो), जे जी एम १७९८- ७५० रुपये (२५ किलो), सिडम श्री १०१-४०० रुपये (६ किलो), पद्मा ३६० रुपये (६ किलो), सोना राजा ५८० रुपये (१० किलो), जय श्रीराम ५८० रुपये(१० किलो) आणि अक्षत ६३० रुपये (१० किलो) विक्री करण्यात येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या खरेदीत घट झाली असल्याचे कृषी केंद्र संचालक सांगतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासह सोयाबीन ५ हजार क्विंटल मागणीपैकी ७०० क्विंटल सोयाबिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तुर ४५० क्विंटल मागणीपैकी ३०५ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
१,५८१ कृषी केंद्र
शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे, कीटकनाशक आणि खते उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात एकूण १५८१ कृषी केंद्र कार्यरत आहेत. यात ४४८ बियाणे केंद्र, ४४८ कीटकनाशक केंद्र आणि ६८५ खतांच्या केंद्रांचा समावेश आहे.