दर्यापूर, थिलोरी मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:43+5:302021-06-16T04:17:43+5:30
दर्यापूर : तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झेलणाऱ्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक ...
दर्यापूर : तालुक्यात खरीप २०२० मध्ये नुकसान झेलणाऱ्या मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना विमा रकमेची तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम अप्राप्त आहे. यंदाच्या खरीप पेरणीच्या अनुषंगाने ती रक्कम तातडीने मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
खरीप हंगाम २०२० मध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व ज्वारी या पिकांसाठी ३७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी ४० हजार ५३६ हेक्टरसाठी विमा काढलेला होता. दर्यापूर तालुक्यात मूग व उडीद या पिकाचा विमा मंजूर झालेला आहे. मात्र, तालुक्यातील दर्यापूर व थिलोरी या दोन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मूग या पिकाची विमा रक्कम अद्यापही मिळालेली नाही. उडीद या पिकाचा विमासुद्धा तालुक्यातील आठही महसूल मंडळांना मंजूर झाला आहे. तथापि, सर्वच शेतकरी विमा रकमेपासून वंचित आहेत. तालुक्यातील १५ हजार ८५ शेतकऱ्यांनी मुगाचा विमा भरला होता. त्यांना २९ कोटी ३७ लाख ३८ हजार ३७४ कोटी रुपये रक्कम मंजूर झाले होते. ११ हजार २३४ शेतकऱ्यांच्या खात्यात २१ कोटी ६३ लाख ९० हजार ४४६ कोटी रुपये रक्कम जमा झाली होती. परंतु, अद्यापही दर्यापूर व थिलोरी या दोन महसूल मंडळांतील ३८५१ शेतकऱ्यांना ७ कोटी ७३ लाख ४७ हजार ९२८ रुपये रक्कम मिळालेली नाही. तालुक्यातील आठही महसूल मंडळातील उडीद विम्यासाठी रक्कम भरलेल्या ३६१५ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४१ लाख ७० हजार ८८९ कोटी रुपये अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. विमा कंपनीमार्फत दिरंगाई होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांकडून येत आहे.
कोट :- तालुका कृषी विभाग याबाबत पाठपुरावा करीत आहे. कंपनीने अद्यापही शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही.
- राजकुमार अडगोकार, तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर