शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:39 AM2019-06-15T00:39:12+5:302019-06-15T00:39:43+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकºयांनी घेतल्याने खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र, शेतकरी आत्महत्येसंदर्भात शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशा जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर नातेवाईक व गावकºयांनी शवविच्छेदनास सहमती दर्शविली.
समृद्धी महामार्गासाठी शेतातच होत असल्याने शेताचे मोजमाप झाल्याशिवाय खोदकाम करू नका, या रास्त मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील रहिवासी अनिल महादेव चौधरी (४५) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वीच सादर केले होते. तरीही गुरुवारी तलावातील खोदकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अनिल चौधरी यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या मागणीचे समाधान झाले नाही. त्यामुळे अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी दालनासमोरच विष प्राशन केले. गाडगेनगर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरून नातेवाइकांसह गावकऱ्यांनी इर्विन रुग्णालयात धाव घेतली. सर्वांच्या संतप्त भावना होत्या. अनिल चौधरी यांच्या रास्त मागण्या मान्य करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने खळबळ उडाली. हा मुद्दा रेटून धरल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी इर्विन रुग्णालयात येऊन चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी अनिल चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सहमती दर्शविली.
समृद्धी महामार्गासाठी मनमानी पद्धतीने अवैध उत्खनन सुरू आहे. त्यांनी दलाल पेरले. अधिकारी सहभागी झाले आहेत. चौधरींच्या तक्रारीची दखल यापूर्वीच घेतली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते. हा ‘समृद्धी’चाच बळी आहे.
- वीरेंद्र जगताप
आमदार, चांदूर रेल्वे
शेतकरी कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल. शेतकरी आत्महत्येसंदर्भात मिळणाºया मदतीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल. याबाबत सकारात्मक प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन नातेवाइकांना दिले आहे.
- विवेक घोडके उपजिल्हाधिकारी
गावकऱ्यांचा आधारवड गेला
अत्यंत मनमिळावू स्वभावाचे अनिल चौधरी हे सर्वांसाठी कोणत्याही वेळी धावून जायचे. तालुक्यात कुठेही काही घडल्यास ते सांत्वन देण्यासाठी पोहोचायचे. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धडपडत असत. गावात येणारा कोणतेही राजकीय किंवा शासकीय पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करायचे. त्यांच्या रूपाने कुटुंबीयांसह गावकऱ्यांचा आधारवड गेल्याची खंत नातेवाईक व गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री लोहगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी मावसभाऊ देवानंद चौधरी, पुतण्या चेतन चौधरी, प्रकाश चौधरी यांच्यासह मित्रपरिवारातील अवि भगत, गजान ठाकरे, डॉ. मनोहरे, छोटू मुंदे, सचिन रिठे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा गौरव, मुली वेदिका व सानिका आहेत.
आत्महत्येपूर्वी मित्राशी फोनवर संवाद
अनिल चौधरी यांचा सर्वात जवळचे मित्र अरविंद भगत यांना मोबाइलवर गुरुवारी दुपारी २ वाजता कॉल आला. शेत धरणात गेले, मी समृद्धीला विकले नाही. माझी परवानगी न घेता शेतात खोदकाम सुरु होते. त्यामुळे मी रोखण्यासाठी गेलो. पोलीस आले, त्यांनी हाकलून दिले. कलेक्टर आॅफीसला गेलो. ते लंचसाठी गेले. त्यानंतर मला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे संभाषण अनिल यांनी केले. मानवधर्म निभविणारा मित्र आमच्यातून निघून गेला. त्याच्या बलिदानाचे सार्थक व्हायला हवे, अशी गावकºयांची मागणी आहे.
जिल्हा परिषदेच्या ठरावाचा बळी
जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापन समितीने १५ मे रोजी ठराव घेतला. गावतलावाचा गाळ काढण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. यासाठी त्यांनी गावतलावालगतच्या सर्व शेतकऱ्यांची परवानगी घ्यायला हवी होती, मात्र, कोणालाही न विचारता आचारसंहितेत हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ठरावाचा अनिल चौधरी हा बळी गेला आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनी केला.
चुलतभावाची मध्यस्थी
अनिल चौधरी यांचे चुलतभाऊ पुरुषोत्तम चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले विवेक घोडके यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून शेतकरी आत्महत्येविषयी दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन घोडके यांनी पुरुषोत्तम चौधरी यांना दिले.