शेतकऱ्यांनी केले एक तास चक्काजाम आंदोलन
By admin | Published: March 24, 2017 12:19 AM2017-03-24T00:19:16+5:302017-03-24T00:19:16+5:30
नाफेडमार्फत तूर खरेदी करताना एका शेतकऱ्याकडून २५ किंटल तूर घेण्यासंदर्भाचा शासन निर्णय झाल्याने व तसे परिपत्रक बुधवारी बाजार समितीला प्राप्त झाले.
वाहतूक ठप्प : नाफेडमार्फत तूर खरेदीची मागणी
दर्यापूर : नाफेडमार्फत तूर खरेदी करताना एका शेतकऱ्याकडून २५ किंटल तूर घेण्यासंदर्भाचा शासन निर्णय झाल्याने व तसे परिपत्रक बुधवारी बाजार समितीला प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाफेड खरेदी करणार की नाही करणार, असा संभ्रम झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मालाचा पंचनामा करुन खरेदी करावी व २५ किंटल तुर खरेदीचा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी दर्यापूर कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर दर्यापूर - अकोट मार्गवर गुरुवारी एक तास शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन छेडले.
सदर आंदोलन दुपारी १ वाजता सुरु झाले दोन वाजेपर्यंत आंदोलन चालले. मालाची खरेदी होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक हे आंदोलन छेडल्यामुळे अकोट, अकोला, अंजनगाव- व अमरावती राज्य महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एकरी पाच ते आठ किंटल तुरीचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार समितीत भरमसाठ तूर विकण्यातसाठी आणण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतकऱ्यांची तूर महिनाभरापासून विक्रीकरिता आणली आहे. नाफेड मार्फत प्रति किंटल बोनससहीत ५ हजार ५० रुपये भावाने खरेदी करण्यात येत असल्याने आवक वाढली आहे. पण नाफेडचे अधिकारी देशमुख गुरुवारी मालाचा पंचनाम करण्यासाठी उपस्थित झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो किंटल मालाची नाफेड खरेदी करणार की नाही, असा संभ्रम झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती बाबाराव बरवट व उपसभापती नरेंद्र ब्राम्हणकर यांना घेराव घातला व तोडगा काढण्याची मागणी केली. ते एवढ्यावरच ते थांबले नाही, तर बाजार समितीच्या प्रवेशव्दाराजवळ अकोट मार्गावर चक्काजाम केला. त्यामुळे सभापती बाबाराव बरवट यांनी भ्रम्णध्वनीद्वारे नाफेडचे डीएमओ देशमुख यांना बोलावून घेतले व शेतकऱ्यांच्या मालाचा पंचनामा करण्यास सांगितले. आंदोलन मागे घेण्यात न आल्याने उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी शेतकऱ्यांना शांत करून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला व शेतकऱ्यांचा माल जो बाजार समितीच्या यार्डमध्ये आहे. त्याची नाफेड खरेदी करेल, असा तोडगा काढण्यात आल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच शुक्रवारनंतर बाजार समितीत विक्री आणला जाणारा शेतकऱ्यांचा माल २५ किंटलच घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे अधिकारी व पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. (तालुका प्रतिनिधी)