भांडवलशाही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे शेतकऱ्यांचा घात
By admin | Published: February 7, 2017 12:14 AM2017-02-07T00:14:40+5:302017-02-07T00:14:40+5:30
भांडवलशाहीला शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाहीत, म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिला जात नाही.
सदानंद देशमुख : शब्दगंध साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
चांदूररेल्वे : भांडवलशाहीला शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाहीत, म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिला जात नाही. त्यांची शेती तोट्यात जाईल, असेच राजकारण सुरू आहे. हे सर्व स्वातंत्र्यापासून सुरू आहे. आज भांडवलशाही, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे व व्यवस्था शेतकऱ्यांचा घात करीत आहे, असे प्रतिपादन साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले. ते चांदूरेल्वे येथील कर्मयोगी गाडगेबाबा साहित्य नगरी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चांदूररेल्वे येथे आयोजित पाचव्या विदर्भस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषणादरम्यान ते बोलत होते.
उद्घाटक शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचे मास कम्यूनिकेशन विभागप्रमुख कुमार बोबडे, प्रमुख अतिथी म्हणून वीरेंद्र जगताप, यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविसकर, उद्घोषक मंगला माळवे, कार्यक्रम अधिकारी जयंत शेटे व नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सूर्यवंशी व शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष हरगोविंद वानरे, मनोहर बाविसकर व सदस्य योगी नाईक यांना सामूहिक मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटक कुमार बोबडे यांनी आजची प्रसारमाध्यमे भांडवलदारांनी विकत घेतली आहेत. आता ‘फोर जी’चा जमाना आला असून, राजकारणही ‘जी’मय झाले आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा व वेदनेशी काही घेणे देणे नाही, असे सांगीतले. आ.वीरेंद्र जगताप यांनी साहित्यातून समाजातील खरे व्यथा व दु:ख मांडले गेले पाहिजे, असे सांगितले.
प्रमोद बाविस्कर यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास, एकनाथ यासह अनेक संतांनी ओवी, अभंग, भारूड यातून दहा लाखांच्यावर काव्याची निर्मिती करून ते लोकांपर्यंत पोहचविल्याचे सांगीतले.
स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी संमेलन अध्यक्ष सदानंद देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, कुमार बोबडे, प्रमोद बाविस्कर, मंगला माळवे यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक शब्दगंध साहित्य व सांस्कृतिक परिषदचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी, संचालन प्रसेनजित तेलंग व आभार रवींद्र मेंढे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेचे कृष्णकुमार पाटील, प्रशांत ठाकरे, नानासाहेब डोंगरे, रवींद्र मेंढे, खुशाल गुल्हाने प्रमोद भागवत, राजीव अंबापुरे, संजय चौधरी, प्राचार्य विश्वास दामले, दीपक सोळंके, अमोल गवळी, विवेक राऊत, निशा जोशी, कविता कटकतलवारे, गोकुल राय, प्रतापसिंह खंडार, उज्वल पंडेकर, भूषण नाचवणकर, अजय वाघ, राहुल तायडे, धीरज जवळकर, दीपिका वाजपेयी, अमोल म्हसतकर, अनुश्री चौधरी, शिवश्री चौधरी, अनिल वाडेकर यांनी प्रयत्न केलेत. (तालुका प्रतिनिधी)