शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:51 PM2019-06-17T23:51:20+5:302019-06-17T23:51:49+5:30

जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत.

Farmers' eyes to the clouds ... | शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

Next
ठळक मुद्देमृगाची हुलकावणी : १० दिवसात ८.५ मिमी पाऊस; पेरण्या लांबल्या, पाणीपुरवठ्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. चार वर्षांचा दुष्काळ दिला; यंदा तरी लवकर ये रे बाबा, अशी भाबडी अपेक्षा त्यांना वरुणराजाकडून आहे. दुसरीकडे पाणीपातळी वाढून विहिरी, बोअरला पाणीसमस्या काही अंशी सुटेल, असा नागरिकांचा अंदाज कोरड्या गेलेल्या मृगाने चुकविला आहे.
जूनच्या दुसºया, तिसºया आठवड्यात साधारणपणे पेरण्या होत असल्या तरी त्यापूर्वी मृगात दोन-तीन पाऊस जाण्याची अपेक्षा असते. तथापि, महिन्याची १७ तारीख आणि मृगाचा अर्धा कालावधी होत असताना, जमीन ओली होण्याइतपत पाऊस कोसळला नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत अवघा एक टक्का पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी आवश्यक असलेला सरासरी ८० मिमी पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खरिपाच्या पेरणीचा अद्याप मागमूसही नाही. चार वर्षांपासून दुष्काळ झेलत असलेल्या शेतकºयांनी शेतीची मशागत, बियाणे सज्ज ठेवले असले तरी जमिनीत पुरेशी ओल येईपर्यंत पेरणी न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पिके घेतली जातात. गतवर्षी ९४ टक्के अर्थात ६.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. २०१९-२० या वर्षात एकूण ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी २.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व २.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित आहे. पावसाने आणखी काही काळ प्रतीक्षा करायला लावल्यास शेतकºयांना पीक पेरणी नियोजन बदलावे लागेल.
२२ ला पाऊस
भारतीय हवामानशास्त्राच्या माहितीनुसार, अमरावतीच्या आसमंतात आभाळ दररोज मिरवित असले तरी उपयुक्त पाऊस २२ जूनपासूनच सुरू होईल.
आतापर्यंत असा झाला पाऊस
१ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. १ ते १७ जून या कालावधीत ८२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात अमरावती तालुका ७.७, भातकुली १८.९, नांदगाव खंडेश्वर ८.१, चांदूर रेल्वे ८.१, धामणगाव रेल्वे १८, तिवसा ५.२, मोर्शी २.७, वरूड ३.६, अचलपूर १७.३, चांदूरबाजार ५.४, दर्यापूर १५.४, अंजनगाव सुर्जी ४, धारणी १.५ व चिखलदरा तालुक्यात १ ते १६ जून या कालावधीत २.६ मिमी पाऊस पडला. गतवर्षी याच कालावधीत एकूण ३९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
अप्पर वर्धात १२.८५ टक्के
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात १७ जूनअखेर ७२.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात १२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर प्रकल्पामध्ये १३.९२ दलघमी (३०.२३ टक्के), चंद्रभागा प्रकल्पात ११.५७ दलघमी (२८.०५ टक्के), पूर्णा प्रकल्पात ८.१८ दलघमी (२३.१३ टक्के) व सपन मध्यम प्रकल्पात १५ दलघमी ( ३८.८६ टक्के) उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची नोंद जलसिंचन विभागाने घेतली आहे.

Web Title: Farmers' eyes to the clouds ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.