शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे
By admin | Published: November 30, 2014 10:58 PM2014-11-30T22:58:03+5:302014-11-30T22:58:03+5:30
दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन
अमरावती : दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यात जाणवायला लागल्या, दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून आहे.
खरीप २०१४ हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस नंतर पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, पीकवाढीला न मिळालेला अवधी, यामुळे खरीप हंगामात सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्के उत्पन्नात घट झाली. वेळेअभावी मूग, उडदाचे पीक हातचे निघून गेले. सोयाबीननेही निराशा केली. एकरी पोत्याची झडती होत आहे, शेंगा पोचट व दाणा बारीक पडल्याने हमीभावाएवढाही भाव मिळाला नाही. उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पन्न झाले नाही. दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनने धोका दिला.
कपाशीचीही तीच गत आहे. लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीचे बोंड फुटायला तयार नाही, हिवाळ्यात रोपे केमेजू लागली आहे. काही ठिकाणी पिवळी पडायला लागली आहे. मूग, उडीद, सोयाबीन हातचा गेल्यामुळे कपासी, तूर, गहू, हरभरा तरी सहाय्य करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. नोव्हेंबर अखेर रबीची ३० टक्केही पेरणी झाली. जमिनीत आर्द्रता नसल्याने हरभऱ्यांची उगवणशक्ती कमी झाली आहे. निघालेले हरभरा पीक आर्द्रतेअभावी कोमेजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची खरीपाची सुधारित आणेवारी ४६ पैसे जाहीर झाली. परिणामी दुष्काळाच्या सवलती व योजना मिळण्याची शक्यता आहे. शासन मदतीचा हात केव्हा देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. धरणामधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईचे सावट आहेत. तसेच वैरणीची समस्या उन्हाळ्यात जाणवणार आहे. (प्रतिनिधी)