बनावट राऊंडअप बीटीच्या विळख्यात शेतकरी

By admin | Published: July 2, 2014 11:09 PM2014-07-02T23:09:38+5:302014-07-02T23:09:38+5:30

जिल्ह्यात मोर्शी व वरूड भागात मागील आठवड्यात पकडलेल्या बनावट बीटी बियाणे तसेच अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील धाडीमध्ये जप्त केलेल्या बनावट बीटी बियाण्यांत साम्य आढळून आले आहे.

Farmers from the fake Roundup BT | बनावट राऊंडअप बीटीच्या विळख्यात शेतकरी

बनावट राऊंडअप बीटीच्या विळख्यात शेतकरी

Next

अमरावती : जिल्ह्यात मोर्शी व वरूड भागात मागील आठवड्यात पकडलेल्या बनावट बीटी बियाणे तसेच अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील धाडीमध्ये जप्त केलेल्या बनावट बीटी बियाण्यांत साम्य आढळून आले आहे. त्यामुळे ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या या भागात बनावट बीटी बियाणे विक्रीचे रॅकेट सक्रिय झाल्याचे स्पष्ट होते. तणनाशकाच्या फवारणीला प्रतिसाद देत असल्याचा प्रचार करीत ग्रामीण भागात बनावट राऊंडअप बीटी बियाण्यांची विक्री होत असल्याने दररोज लाखो रूपयांनी शेतकऱ्यांची लूट होत आहे. याकडे मात्र कृषी विभाग हेतुपुरस्सरपणे डोळेझाक करीत आहे.
शेतमजुरीच्या दरात कमालीची वाढ झाल्याने तण व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. तसेच निंदणाच्या वेळी मजुरांची वानवा असते. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे तणनाशक फवाऱ्यांना प्रतिसाद देणाऱ्या बियाण्यांच्या शोधात शेतकरी असतो. नेमकी हीच बाब हेरून तणनाशकांचादेखील वापर करता येईल, असे सांगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बनावट राऊंडअप बीटी बियाणे अत्यल्प किमतीत विकण्यात येत आहे. ‘ग्लायफोसेट’ हे तणाला प्रतिबंध घालणारे जिन्स रेडी राऊंडअपमध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे कपाशीवर तणनाशकांची बिनधास्त फवारणी करता येते. याचा कुठलाही विपरित परिणाम होत नाही आणि निंदणाचा खर्च वाचतो, अशी बतावणी करणारी मार्केटिंग ग्रामीण भागात सर्रास सुरू आहे. मुळात बनावट बीटी बियाण्यांमुळे शेतात तणच उगवत नाही, हे तणाला प्रतिबंध घालते, असेही शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.
या भुलभुलैयाला शेतकरी बळी पडून लाखो रूपयांनी नाडवला जात आहे. महागडे व विक्रीवर बंदी असलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून रोज लाखो रूपयांची लूट सुरू आहे. कृषी विभाग मात्र याविरुध्द कारवाई करण्यास डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers from the fake Roundup BT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.