सोयाबीन वाळवताना अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबे हवालदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:50 AM2019-11-08T11:50:03+5:302019-11-08T11:52:22+5:30
पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत.
धीरेंद्र चाकोलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत. केव्हा एकदा सोयाबीनचा ओलसरपणा कमी होतो आणि यातून सुटका होते, याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
यंदाच्या खरिपात उशिरा पाऊस येऊनही चांगल्या स्थितीत असलेले सोयाबीन परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून सडले. तथापि, सोंगण्याची घाई करून काही जणांनी सोयाबीन घरी आणण्याचा आटापिटा केला. त्यात ते यशस्वी झाले खरे; मात्र दिवाळीच्या आसपास झालेल्या पावसामुळे सोयाबीनची आर्द्रता कायम होती. बाहेर पाऊस कोसळत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन पसरले होते.
आर्द्रता असल्याने या ढिगाचे तापमान प्रचंड वाढले होते. हे तापमान कमी करण्यासाठी हाता-पायाने सोयाबीन पसरविण्याचे काम सुरू झाले. हे काम साहजिकच शेतकऱ्यांच्या चिमुकल्या मुलांवर आले. दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्याच्या मानसिकतेत असलेल्या मुलांना या कामासाठी हात-पाय झिजवावे लागले.
भारनियमनाची चिंता
एरवी ग्रामीण भागात भारनियमनाची चिंता केली जात नाही. तथापि, ओलसर सोयाबीन सुकविण्यासाठी घरात दिवे व पंखे सुरू ठेवण्यासाठी भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली. काही घरांमध्ये कूलर लागले आहेत.
मुलांच्या पायांना आले गोळे
घरात पसरविलेले सोयाबीन खाली-वर करण्यासाठी ते तुडविण्याचे काम शेतकरी कुटुंबात मुलांवर आले होते. बाहेर पाऊस कोसळत असल्याने घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, घरी त्यांना स्वस्थ बसू न देता सोयाबीनचे काम देण्यात आले. या कामात मुलांच्या पायांना गोळे आले आहेत.