मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By Admin | Published: February 18, 2017 12:11 AM2017-02-18T00:11:53+5:302017-02-18T00:11:53+5:30
शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.
किरण गित्ते : प्रशिक्षणासाठी ३०० ट्रॅक्टर चालकांची नोंदणी
अमरावती : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे. मात्र खारपाणपट्ट्यात जमिनीचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकासअंतर्गत प्रभा मंगलम् कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टरचालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे, सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात. स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते. स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अंजनगाव दयार्पूर व भातकुली या तालुक्यामध्ये खारपाणपट्टा आहे. २२ गावातील खारपाणपट्ट्यातील गावांना शेततळ्याची गरज आहे. जिल्ह्यात ४५०० शेततळ्याचे उद्दिष्ट्य असून त्यापैकी २५०० हे अंजनगाव दर्यापूर तालुक्यात करायचे आहेत. वैज्ञानिक पद्धतीने शेततळे केले तर जास्तीत जास्त अर्धा एकरपर्यंत शेत जाऊ शकते. मात्र त्यातून उर्वरित शेताला संरक्षित सिंचन देऊन पिकाची उत्पादकता वाढवता येते. रामागड व नरदोडा या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून हरभऱ्याच्या पिकात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात ५०६ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून येत्या एप्रिल मध्ये २५० गावे आणखी जलयुक्त शिवारमध्ये घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात २५० विहिरी धडक सिंचन मोहिमेत घेण्यात आल्यात. मार्च २०१६ अखेरपर्यंत वीजजोडणीसाठी जवळपास १७०० शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिला डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा दोन शेतकऱ्यांना देण्यात आला. शेततळ्याची निर्मिती करून वाढीव उत्पन्न घेणाऱ्या विलास टाले नरदोडा व विजय लांजूळकर या दोन शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. आशुतोष गोळे या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली. शेततळे तयार करण्याचे उद्दिष्टे असल्याने त्यासाठी ट्रॅक्टरसह कुशल मनुष्यबळ तयार करणे, हेसुद्धा आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित ट्रॅक्टरचालक तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात ३०० ट्रॅक्टरचालकांची नोंदणी झाली आहे.