शेतकऱ्यांनो संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:47 PM2017-12-26T22:47:55+5:302017-12-26T22:48:22+5:30
शेतकरी जोपर्यंत विकासासाठी संघटित होत नाही, किती शेतकऱ्यांनी कोणते पीक लावायचे, याचे संघटित होऊन नियोजन करत नाही, तोपर्यंत आपल्या मालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार आपल्याला मिळणार नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकरी जोपर्यंत विकासासाठी संघटित होत नाही, किती शेतकऱ्यांनी कोणते पीक लावायचे, याचे संघटित होऊन नियोजन करत नाही, तोपर्यंत आपल्या मालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे केवळ मागण्यांसाठी नव्हे तर विकासासाठी संघटित व्हा, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
शिक्षणमहर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९ व्या जयंत्युत्सवानिमित्त श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय सभागृहात आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते. महाआॅरेंजचे संचालक श्रीधरराव ठाकरे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले, तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य अशोकराव ठुसे, सचिव शेषराव खाडे, सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबईचे संचालक सतीश परब, नितीन मार्केंड्य, औषधी व सुगंधी वनस्पती शास्त्रज्ञ रोकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘निर्यातक्षम फलोत्पादन तंत्रज्ञान व कृषी पूरक उद्योग’ विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत नंदकिशोर चिखले, मानकर, सुनील इंगळे, व्ही.यू.शिंदे, नंदकुमार मानकर यांनी केले. संचालन पी.डी. देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन व्ही. यु. शिंदे यांनी केले. यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनीला पाहुण्यांनी भेट दिली. परिसरातील शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.