शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
By Admin | Published: April 25, 2017 12:03 AM2017-04-25T00:03:02+5:302017-04-25T00:03:02+5:30
शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली.
शासनाचे घुमजाव : फक्त यार्डातली तूर खरेदी करणार, खुल्या बाजारात भावात घसरण
अमरावती : शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली. सद्यस्थितीत बाजार समित्यांच्या यार्डात अडीच लाखांवर पोते व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील दहाही तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. सोमवारी मुदतवाढ मिळण्याचीे आशाही संपुष्टात आली. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी मोठ्या फरकात भाव पाडल्याने शेतकरी कमालीचे संतापले.
शासनाने २६ ते २८ डिसेंबर २०१६ पासून जिल्ह्यातील १० केंद्रांवर शासकीय तूर खरेदी सुरू केली. ही केंद्र आतापर्यंत जेवढे दिवस सुरू होती त्यापेक्षा अधिक दिवस बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणांमुळे बंद राहिली. त्यामुळे या केंद्रांवर मोजणीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागली. या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल रोजी केंद्राने सर्व केंद्र बंद केल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.
‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा?
अमरावती : अखेर शासनाला उपरती झाली व केंद्रांना १७ ते २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील बारदाना संपल्याने भंडारा येथून १ लाख बारदाना मागविण्यात आला. एफसीआयला भाडेतत्त्वावर देण्यात आला. या सर्व कसरती होऊन केंद्र सुरू झाली तर आता शनिवारपासून पुन्हा बंद करण्यात आली. दरम्यान नाफेडच्या राज्य संचालक विनाकुमारी यांनी जिल्ह्यासह विभागातील काही केंद्रांना भेटी दिल्यात. त्यांना शेतकरी संतापाचा सामना करावा लागला. त्यांना देखील मुदतवाढीसाठी शासनाला प्रस्ताव दिला. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनीदेखील जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमुद करून सर्व केंद्राला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणनच्या अप्पर मुख्य सचिवांना दिला. मात्र अद्यापपावेतो शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळाली नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहे. सर्वच तालुक्यात तहसीलदारांना व जिल्हाधिकाऱ्यांना या विषयीचे निवेदन देण्यात आली आहेत. या केंद्रावर सध्या अडीच लाख तुरीचे पोते पडून असल्याने शेतकरी कमालीचे संतप्त आहे.
तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचाच माल अधिक असतो. किंबहुना यंत्रणांशी त्यांची हातमिळवणी असल्याने त्यांच्या मालास प्राधान्याने टोकन दिले जाते, याविषयी तक्रारी झाल्याने शासनाने १०० क्विंटलवर तुरीची विक्री करणाऱ्यांपैकी शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी कोणते ? हे शोधण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लावली. बाजार समितीमधील तुरीचे आवक रजिस्टर ताब्यात घेवून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत नव्याने रजिस्टर ठेवण्यात आले व यापूर्वी शंभर क्विंटलच्यावर तूर विकणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ११३ शेतकरी आढळले. मात्र यामध्ये शेतकऱ्याच्या नावाच्या आड व्यापारी कोण? हे मात्र गुलदस्त्यात आहे. अद्याप एकाही व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने शासनाचा हा फुसका बार ठरला आहे. (प्रतिनिधी)
लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून
शासकीय खरेदी केंद्रांवर सुरुवातीच्या काळात खरेदी झालेली बहुतांश तूर ही व्यापाऱ्यांची होती. शेतकरी मात्र खुल्या बाजारात तुरीचे दर वाढतीत या अपेक्षित राहिले. मात्र तुरीचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याने आता कुठे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली. अजूनही लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. शनिवारपासून केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
१.१५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार
जिल्ह्यातील दहाही तुरीचे केंद्र २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आले. मात्र त्या दिनांकापर्यंत केंद्रावर जेवढ्या तुरीची आवक झाली व जी तूर खरेदी व्हायची आहे तेवढ्याच तुरीची खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी व्ही.सी.द्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे जिल्ह्यातील यार्डात पडून असलेली १.१५ क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे.
व्यापाऱ्यांनी १२०० रुपयांनी पाडले भाव
तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळणार नसल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले. हमीभावापेक्षा १२०० ते १५०० रुपयांनी कमी दरात तुरीची खरेदी करण्यात आली. अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला ३५०० ते ३९५० रुपये भाव मिळाला. शनिवारपर्यंत हेच भाव ३५०० ते ५०५० या दरम्यान होते. व्यापाऱ्यांच्या या षडयंत्रावर शासन काय कारवाई करणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत जी तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तीच तूर खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार १.१५ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात येईल.
- के.पी. परदेशी,
जिल्हाधिकारी