धामणगावात १५ दिवसांपासून शेतकऱ्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:32+5:302021-04-01T04:13:32+5:30
फोटो - ३१ एस राऊत धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा ...
फोटो - ३१ एस राऊत
धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा मोबदला अद्यापही न मिळाल्याने मिर्झापूर येथील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर १५ दिवसांपासून उपोषण थाटले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच उपोषणाला बसले आहे.
मिर्झापूर येथे रहिवासी विमल रूपराव मांडवगणे यांचे शेत शहापूर गट क्रमांक २८/२ मध्ये आहे. त्यांच्या शेतात संत्र्याची मोठी झाडे आहेत. शेताच्या बाजूला लागून रस्ता बांधकाम कंपनीने स्टोन क्रशर, सिमेंट प्लांट, डब्ल्यूएमएम प्लांट उभारला आहे. त्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाल्याचे सहा महिन्यांपासून या शेतकऱ्याने महसूल व जिल्हा प्रशासनाला अर्ज केले. महसूल प्रशासनाने स्थळनिरीक्षण केले. मात्र, वेगवेगळे जाहीरनामे काढून दिशाभूल केली. संत्राबागेच्या नुकसानामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असल्याने रूपराव मांडवगणे यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाकडे तालुका व जिल्हा प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले सबंधित शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन सिंघवी यांनी पुढाकार घेऊन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यामार्फत राज्य शासनापर्यंत अहवाल सादर केला. मात्र, पंधरा दिवसांपासून तोडगा निघालेला नाही. यादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.