हिवरखेड मंडळातील शेतकरी फळपीक विम्यापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:29+5:302021-07-19T04:09:29+5:30
मोर्शी : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्यावतीने ...
मोर्शी : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्यावतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. ते दापोरी येथे न बसविता वरूड तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळपीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीकविमा मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
हिवरखेड महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ चा मृग संत्रा बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला असून कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र महसूल मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता वरूड तालुक्याच्या सीमेवरील उमरखेड येथे बसविल्यामुळे हिवरखेड मंडळात ५ जून ते १५ जुलै दरम्यान दापोरी येथे ८५.५ मिली मीटर पासवसाची नोंद झाली. उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्यामुळे हिवरखेड महसूल मंडळात अत्यल्प पाऊस होऊनही फळपीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादकांवर आली असल्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाळके यांनी दापोरी येथे पडलेल्या पावसाची नोंद ग्राह्य धरून हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र दापोरी येथे बसवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.