शेतकऱ्यांचे उपोषण, गुरेही आंदोलनस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:14 AM2017-04-06T00:14:15+5:302017-04-06T00:14:15+5:30
उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतकऱ्यांच्या शेतात साचत असल्याने प्रचंड हानी होत आहे.
पाझरामुळे शेतीचे नुकसान : जलसंपदाकडे भरपाईची मागणी
अमरावती : उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरून शेतकऱ्यांच्या शेतात साचत असल्याने प्रचंड हानी होत आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सोनगाव व कळमगांव येथील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र आंदोलनस्थळी बैलजोडीेही सोबत असल्याने हे आंदोलन चर्चेत आले आहे. नुकसान भरपाईची मागणी उपोषणकर्त्यांनी येथील जलसंपदा विभागाकडे केली आहे.
तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. यात काही जणांची प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी बुधवारी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, चांदूररेल्वे तालुक्यातील सोनगाव व कळमगावनजीक शिवणी प्रकल्प आहे. याप्रकल्पालगतच शेतकऱ्यांची शेती आहे. शेतात प्रकल्पाचे पाणी पाझरत असल्याने पावसाळ्यात दलदलसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागले आहे. भविष्यातही या शेतीत उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे. खरीप व रबी पिकांची एकरकमी नुकसान भरपाई देण्यात यावी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, पेरणीयोग्य नसलेली शेती अधिग्रहित करून तत्काळ मोबदला देण्यात यावा, आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठांना यासंदर्भात अनेकदा निवेदन दिले आहे. परंतु दखल घेण्यात आली नाही. अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषण आरंभले. यामध्ये मनोहर वाघ, संध्या आसोले, संजट मेटे, दिनेश आमले, विजय सराड, प्रशांत वासनिक, अतुल मेटे, पुरूषोत्तम कांबळे, प्रशांत शिरभाते, प्रमोद शिरभाते उपस्थित आहे.