गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:50 PM2023-11-18T13:50:40+5:302023-11-18T13:52:07+5:30

रब्बी हंगाम; जमिनीत आर्द्रतेचा अभाव, पेरणीवर मोठा असर

farmer's inclination towards wheat, gram, turned his back on oilseed crops | गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

अमरावती : रब्बी हंगामात दरवर्षीच तेलबिया पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. आतापर्यंत फक्त १३२२ हेक्टर क्षेत्रात गळीत धान्याची पेरणी झालेली आहे. बाजारातील अनिश्चितता, पक्ष्यांचा त्रास व सिंचनास पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रब्बीत गहू व हरभरा या दोन पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी अमरावती विभागात ७.४६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत १७ नोव्हेंबरपर्यंत १.८८ लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २५ टक्केवारी आहे. महिनाभरापासून रब्बी हंगाम सुरू झाला असताना पेरणीचा टक्का वाढत नसल्याने चिंता वाढली आहे. यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर पावसाळ्यात १२ तालुक्यात पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही. याशिवाय ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने जमिनीत आर्द्रता नाही व पुनर्भरण न झाल्याने भूजलस्तरात कमी आलेली आहे. याचा थेट असर रब्बीच्या पेरणीवर झालेला आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे १५ ते २० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत फक्त हरभरा १.६६ लाख हेक्टर व गव्हाची १५०३७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

जवस, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र निरंक

विभागातील ७.४६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत करडई १०३९ हेक्टर, मोहरी २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याशिवाय सूर्यफूल ७ हेक्टर, जवस २ हेक्टर तर तिळाचे क्षेत्र निरंक आहे. ऐन हंगामात बाजारात पडणारे भाव, आवकच नसल्याने मागणीत घट व करडईच्या हंगामात मजुरांची कमतरता यामुळे गळीत धान्याचे पेरणीक्षेत्र कमी होत आहे.

काही वर्षात करडई, सूर्यफुलाचे क्षेत्रात घट झाली आहे. तेलबियांचे क्षेत्र वाढावे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: farmer's inclination towards wheat, gram, turned his back on oilseed crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.