अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनविभागाची डोळेझाक, नागरिकांत संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 06:03 PM2018-01-14T18:03:42+5:302018-01-14T18:05:14+5:30
हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे.
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे.
शुक्रवारी हिरापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर फरकुंडे हे सकाळी ११ वाजता कपाशीच्या शेतात गेले होते. त्यांच्यावर अचानक अस्वलीने हल्ला केला. यापूर्वी याचा शेतात त्यांचा मुलगा मनोज याच्यावर काही दिवसांपूर्वी अस्वलाने हल्ला करून जखमी केले होते, तर त्याआधी याच परिसरात गजानन कावरे यांच्यावर अस्वलीने हल्ला के ला होता. या संपूर्ण घटनेची माहिती दहिगाव वनविभागाच्या कर्मचा-यांना देण्यात आली आहे.
काही दिवसांत अस्वलीचे हल्ले वाढल्याने मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. कपाशीची वेचणी व तुरीची सवंगणी अस्वलाच्या दहशतीपोटी थांबली आहे. अस्वलीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मात्र वन विभागाने या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. एकाच शेतात दोन घटना घडल्या. वन विभागाला तसे कळविले मात्र, कुणीच येऊन पाहिले नाही, यामुळे वनविभागाच्या कारभाराविषयी शंका निर्माण झाल्याचे मत जखमी शेतकरी ज्ञानेश्वर फरकुंडे यांनी व्यक्त केले.