अन् पर्जन्यमापक यंत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 12:12 PM2022-09-15T12:12:49+5:302022-09-15T13:02:56+5:30

चांदूर बाजार ( अमरावती ) : पर्जन्यमापक यंत्राच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे तसेच ना दुरुस्त बॅटरीमुळे प्रत्यक्ष झालेल्या पावसाचे प्रमाण ...

farmers locked up the agriculture officials due to the failure of the rain gauge machine | अन् पर्जन्यमापक यंत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच कोंडले

अन् पर्जन्यमापक यंत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच कोंडले

googlenewsNext

चांदूर बाजार (अमरावती) : पर्जन्यमापक यंत्राच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे तसेच ना दुरुस्त बॅटरीमुळे प्रत्यक्ष झालेल्या पावसाचे प्रमाण कमी दाखवत असल्याचा प्रकार उघड होताच ग्रामस्थांनी दोन कृषी अधिकारी व एका कर्मचाऱ्याला गावातील सभागृहात डांबून ठेवले. तळेगाव मोहना येथे बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

यावर्षी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. जुलै, ऑगस्ट महिन्यात धो धो बरसलेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश मंडळातील पिकांची वाढ खोळंबली. यात कोट्यवधी रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली. राज्य शासनातर्फे तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची मदत करण्यात आली आहे; मात्र उर्वरित दोन महसूल मंडळात अतिवृष्टी न झाल्याचा शासनाच्या अहवालामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची कोणतीही मदत मिळाली नाही. याकरिता तळेगाव मोहना येथील शेतकरी व प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले यांनी तालुका कृषी अधिकारी व महावेधच्या कर्मचाऱ्यांना पर्जन्यमापक यंत्रांची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्या पर्जन्यमापक यंत्राच्या आजूबाजूला १५ फुटापर्यंत झाडीझुडपे वाढलेली आढळून आली. तसेच बॅटरीसुद्धा नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले.

शेतकऱ्यांना मोबदला द्या...

सबब, तळेगाव येथील शेतकरी संतप्त झाले. त्यांनी उपस्थित सहायक कृषी अधिकारी दांडेगावकर व सांगळे यांच्यासह पर्जन्यमापक यंत्राच्या कंपनीचा कर्मचारी गौरव बोके याला गावातीलच एका सभागृहात डांबून ठेवले. शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडणार नसल्याचा पवित्रा या संतप्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी शेतकरी बाळासाहेब भुजबळ, मनीषा शेकोकर, ज्ञानेश्वर काळे, रघुनाथ नवलकर, मुकेश चरपे, अमोल तनपुरे, संतोष शेकोकार, मारोतराव भुजबळ, अमोल अकोलकर, जगदीश आकोलकर आदी उपस्थित होते.

Web Title: farmers locked up the agriculture officials due to the failure of the rain gauge machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.