बळीराजाचा संयम सुटला, कपाशीची लागवड सुरू
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 27, 2023 03:16 PM2023-06-27T15:16:03+5:302023-06-27T15:17:55+5:30
पावसाचा खंड राहिल्यास संकट, १५ हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी
अमरावती : पावसाचे दोन नक्षत्र अन् जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार असल्याच्या वार्तेने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती आहे.
पाऊस नसल्याने ६० दिवसांच्या कालावधीत येणारे मूग व उडदाचे पीक आता बाद झाले आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीन, तूर व कपाशीची नियमित पेरता येते व त्यानंतर मात्र २० टक्के बियाणे जास्त वापरून लवकर येणारे वाण पेरणे व आंतरपिकाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची काही ठिकाणी नोंद होत आहे. याशिवाय मान्सून सक्रिय झाल्याच्या भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) वार्तेनंतर काही भागांत कोरड्यातच पेरण्या सुरू झाल्या आहेत. पाऊस येणार आहे. त्यामुळे पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कपाशीची १० हजार हेक्टरमध्ये लागवड
जिल्ह्यात सद्य:स्थितीत १५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४४१ हेक्टरमध्ये कपाशी, १७०३ हेक्टरमध्ये सोयाबीन, २२९६ हेक्टरमध्ये तूर, २८ हेक्टर धान, २८ हेक्टर ज्वारी, ७५ हेक्टरमध्ये मक्याची पेरणी झालेली आहे. सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर पेरणी वरूड तालुक्यात झालेली आहे.