तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम
By Admin | Published: June 20, 2017 12:10 AM2017-06-20T00:10:02+5:302017-06-20T00:10:02+5:30
टोकन दिल्यावर घरी पडून असेलेली तूर खरेदी करावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी अमरावती-यवतमाळ मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा : ३० हजार क्विंटल तूर घरीच पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : टोकन दिल्यावर घरी पडून असेलेली तूर खरेदी करावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारी अमरावती-यवतमाळ मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन केले.
नाफेडने तूर खरेदी सुरू केल्यावर शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. १० जून रोजी नाफेडने तूर खरेदी बंद केली. नांदगाव खंडेश्वर बाजार समितीने १३६९ शेतकऱ्यांना टोकन दिले आहे. मात्र पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी तूर बाजार समितीमध्ये न आणता ती आपल्या घरीच ठेवावी, असे सांगितल्याने सुमारे ३० हजार पोते तूर शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे. पेरणीचा हंगाम आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. यामुळे तूर खरेदी करून मोबदला द्यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार मोरे व सहायक निबंधक जयंत पालटकर आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्याशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना दोन-तीन दिवसात निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे २३ जून पर्यंत मागणीचा विचार करून तूर खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशार यावेळी किशोर गौरखेडे, मनोहर सावंत, अनिल राजकुले, राजेंद्र आगळे, बाबा मुरादे, गणेश गवई, आशीष कडू, पुंडलिक मेंदूरकर, गुणवंत ढोके यांनी दिला.