शेतकऱ्यांनी केली पालेभाज्यांची निर्मिती
By admin | Published: April 11, 2016 12:10 AM2016-04-11T00:10:34+5:302016-04-11T00:10:34+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ....
विकास, समृद्धीकडे वाटचाल : योग्य नियोजनामुळेच शेती व्यवसाय शक्य
नितीन टाले कावली वसाड
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा हे गाव पाणी नसल्यामुळे उत्पादन घेण्यापासून वंचित होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अप्पर वर्धा धरणाचे पाणी व बगाजी सागरमुळे पाण्याची आवक वाढल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. या गावाची ओळख भाजीपाला उत्पादन करणारे गाव अशी झाली आहे. त्यामुळे दाभाडा गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पीक घेणे कठीण झाले. लागलेले पैसे मिळणे कठीण झाले. त्यामुळे दाभाडा येथील शेतकरी नंदकिशोर कोकटे यांनी १० एकर शेतात वांगी, टमाटर, केळी ही पिके लावून योग्य त्याची दखल घेत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वत: एक चारचाकी वाहन घेतले आणि वर्धा, अमरावती, पुलगाव, आर्वी, धामणगाव येथील बाजारपेठेत विकण्यास शेतकरी नेत आहे. महादेव हलवारे यांनीही आलू, मका यासारखी पिके घेऊन एक आदर्श ठेवला. दिलीप वसू हे शेतकरी भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ते स्वत: पालेभाज्यांची विक्री करतात, हे विशेष. एकीकडे ज्वारीसारखे पीक वन्यप्राण्यांमुळे फस्त होत असल्याने या पिकाकडे कुणीही पाहत नव्हते. मात्र, राजू बुगल यांनी विक्रमी ज्वारीचे पीक घेतले आहे. कमलकिशोर पनपालीया यांनी आपल्या शेतात लसून आणि कांद्याची लागवड केली. विक्रमी पीक झाल्याने अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. विजय पनपालिया यांनी आपल्या शेतात केळी, मिरची, टरबूज ही पिके घेण्याची सुरुवात केली. परंतु यंदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही हार न मानता त्या पिकांची योग्य देखभाल करून तसेच पाण्याचे वेळेवर नियोजन करून पीक घेण्यासाठी सज्ज झाले. सोबतच अनेक शेतकरी आपल्या परीने शेतात सांभार, पालक, ढेमस, काकडी, भेंडी यासारखी पिके लावून संसाराचा गाडा ओढत आहे. अनेक शेतकरी शेती सोबतच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. गावातून दररोज ३०० ते ४०० लिटर दूध धामणगाव रेल्वेच्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जाते. गाई आणि म्हशींची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्यांप्रमाणे दुग्ध व्यवसायाकडे गावातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.