नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:58 PM2018-10-09T21:58:28+5:302018-10-09T21:59:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शासनाने मूग, सोयाबीन व उडदाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक शेतकरी येथे खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली. सोमवारी नोंदणी होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच शेतकºयांनी रांग लावल्याने गर्दी झाली. त्यामुळे नोंदणीस्थळी एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान शेतकऱ्यांची बाचाबाजी झाल्याची माहिती आहे.
नाफेडचे आॅनलाईन सेंटर उघडण्यात आले आहे. येथे चार टेबलवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून कागदपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, आपला प्रथम क्रमांक लागला पाहिजे या ईर्ष्येने दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांनी एकाचवेळी केंद्रावर धाव घेतली. सर्वांना रांगेत राहण्यास सांगण्यात आले. पण, काही शेतकºयांनी आपला नंबर आधी लागावा यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. नाफेडची आॅनलाईन नोंदणी बंद तर होणार नाही ना, त्या कारणाने आपला नंबर आधी लागावा, असे प्रत्येकांना वाटत होते. त्यामुळे केंद्रावर सर्वांनी एकाचवेळी धाव घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहूनच नोंदणी करा, अशी विनंती ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी केली. पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही शेतक?्यांची लोटपोट झाली. या ठिकाणी तातडीने एसडीओ आंबेकर तहसीलदार अमोल कुंभार दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांततेत नोंदणी करण्याचे आवाहन केले. या प्रक्रियेसाठी योग्य नियोजन नसल्यानेच ही स्थिती ओढवल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
सबएजंटचे नियोजन कोलमोडले
नाफेडची आॅनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली खरी मात्र नाफेडच्या अधिकाऱ्यांकडे कुठलेच नियोजन नव्हते. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी धाव घेतल्याने कागदपत्र तपासणी रजिस्टरमध्ये नोंद करताना मनुष्यबळाचा अभाव जाणवला. मंगळवारच्या रात्री सुध्दा शेतकऱ्यांनी शेतकरी सदनच्या आवारात ठिय्या मांडला त्यांनी नोंदणीसाठी रात्र जागुन काढली.
मंगळवारी पोलीस बंदोबस्तात नोंदणी
मंगळवारी सकाळी ७ वाजता पासून नाफेडची आॅनलाईन नोंदणी शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. एसडीओ आंबकेर, तहसीलदार अमोल कुंभार, उपाविभागीय पोलीस अधिकारी सुनील काळे, ठाणेदार मुकुंद ठाकरे आदींची या ठिकाणी उपस्थिती होते. कुठलाही गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नाफेडच्या नोंदणीसाठी एवढे शेतकरी येतील याचा अंदाज नव्हता. त्यामुळे एकदम गोंधळाची स्थिती उदभवली. परंतु आता ती सुरळीत झाली आहे. मंगळवारी १ हजार शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे.
- राजेंद्र गावंडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ दर्यापूर