शेतकऱ्यांची बियाणे जमिनीत, नजरा आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:19+5:302021-06-18T04:10:19+5:30
धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. ...
धारणी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चार-पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून बियाणे शेतात टाकण्यात आले. मात्र, चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आशेने पाहू लागले आहे.
रोज सकाळी आकाशात पावसाचे ढग घोंगावत असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात संध्याकाळ होता होता आकाश निरभ्र होत चालले असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेळघाटातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात यंदासुद्धा सोयाबीनला पहिली पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मक्याच्या पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशातच पावसाने मृग नक्षत्रात ८ ते १३ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. दरम्यान, पावसाने आता मोकळीक दिली आहे. आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. अनेकांची बियाणे उगवले आहे, तर काही शिवारात त्यांनी जमिनीबाहेर डोके काढले आहे. पावसाने आणखी उशीर केल्यास हजेरी न लावल्यास बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत आहे.
दुसरीकडे कृषी विभागाकडून समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. तथापि, ऐनवेळी पावसाने उसंत न दिल्यास पेरणीत अडचण निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. मेळघाटात खरीप हंगामात धान, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिके घेण्यात येतात. प्रामुख्याने सोयाबीन, धान, तूर व मका यंदा शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहेत.