शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी
By admin | Published: January 17, 2016 12:06 AM2016-01-17T00:06:59+5:302016-01-17T00:06:59+5:30
पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही.
ना. प्रवीण पोटे : प्रदर्शनी, शेतकरी मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन
अमरावती : पशुपालनाचा खर्च परवडत नाही म्हणून पशू पालनाची मानसिकता शेतकऱ्यांकडे राहिली नाही. मात्र गाई-म्हैशी पालनातून घरातील स्त्रियांच्या हातात खेळता पैसा राहतो. त्यातून ती स्त्री घराचा थोडातरी खर्च भागवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला उपयुक्त पशू जोपासना करावी, असे आवाहन उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
शनिवारी तळेगाव दशासर येथे आयोजित पशू प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. वीरेंद्र जगताप, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, पं.स.सभापती झाडे, धामणगाव रेल्वे पंसचे सभापती गणेश राजनकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय मुळे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, सचिन पाटील, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, संगीता निमकर, वनिता राऊत, मनोज बानोडे, अब्दुल बशीर शेख हुसेन, कृषक मंडळाचे अध्यक्ष विनोद देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अशोक हजारे उपस्थित होते.
मुद्रा योजनेच्यामार्फत तरुणांनी उद्योगासाठी अर्थसहाय्य घेऊन स्वत:ची प्रगती साधावी, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार, पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान याविषयीचा धावता आढावा घेतला. यावेळी समाधान शिबिरांतर्गत लागलेल्या वेगवगेळ्या स्टॉलना पालकमंत्र्यांनी भेट दिली. आ.वीरेंद्र जगताप यांनी तळेगाव दशासर येथील तिनशे वर्षांपासूनची शंकरपटांची परंपरा पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली.
जिल्ह्यात एकूण लोकसंख्या २८ लक्ष असून त्यापैकी फक्त २ लाख ४८ हजार लोकांकडेच गायी-म्हैशी आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही. तेव्हा शेतीला कुक्कुटपालनाचे, मेंढीपालनाचा पूरक व्यवसाय करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)