शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांचे जतन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:20+5:302021-01-21T04:13:20+5:30
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, कृषिसहायकांकडून तपासणी धामणगाव रेल्वे : यंदा खरीप हंगामातील उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे ज्या शेतकऱ्यांकडे ...
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, कृषिसहायकांकडून तपासणी
धामणगाव रेल्वे : यंदा खरीप हंगामातील उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध् आहे, त्यांनी तालुक्यातील कृषिसहायकांकडून तपासणी करून आगामी हंगामासाठी जतन करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी केले आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात सन २०२१-२२ या खरीप हंगामात सोयाबीन लागवड अंदाजे २३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर होईल. त्यानुसार तालुक्यात १७ हजार ३२५ क्विंटल बियाणे लागणार आहे. गतवर्षी कापणीच्या वेळी अधिक पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यामुळे खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार ७७२ .९५ क्विंटल सोयाबीन बियाणे घरी साठविलेले असल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. स्थानिक पातळीवर सोयाबीन बियाणे जतन करून ठेवण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील कृषि सहायकांनी ६९ शेत शिवार, चावडी व सर्वच गावात सभा घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगून जनजागृती केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन बियाणे घरी साठवणूक करून ठेवले आहे, त्यांनी पुढील खरीप हंगामाकरिता बियाणे उपलब्ध करण्यासाठी हंगामापूर्वी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासणी करून घ्यावी व त्यानंतर आपल्याच गावातील शेतकऱ्यांना हे बियाणे खरीप हंगामात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी केले आहे.