जिल्हाधिकारी दालनासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:24 AM2019-06-14T01:24:27+5:302019-06-14T01:26:00+5:30
समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कक्षापुढेच एका इसमाने विष प्राशून व अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १३ जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सदर इसमाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून बाटली जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कक्षापुढेच एका इसमाने विष प्राशून व अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १३ जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सदर इसमाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून बाटली जप्त केली. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनिल महादेव चौधरी (४५, रा. लोहगाव, ता. नांदगाव खंडेश्वर) असे स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करणाºया इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातून जाणाºया नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी लोहगाव येथील शेतकºयांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. महामार्गासाठी लागणारा मुरुम लोहगाव येथील ई- क्लास जमिनीतून काढण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. मात्र, लोहगाव येथे ही ई-क्लास जमीन मोजकीच असल्याने येथून मुरुम काढण्यास मनाई करावी, गायरान कायम ठेवावे, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून अनिल चौधरी हे जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी गुरुवारीदेखील या मुद्द्यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याच्या भावनेतून अनिल चौधरी यांनी कक्षाबाहेर पडताच सोबत आणलेले कीटकनाशक सेवन केले आणि रॉकेल अंगावर ओतून घेतले. मात्र, उपस्थित सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या हे लक्षात आले. त्यांनी बॉटल हिसकावली आणि अनिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाइल व दुचाकी जप्त करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीसही दाखल झाले. त्यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.
इर्विन रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक आर.जे. चंदापुरे व हेडकॉन्स्टेबल हेमंत वाकोडे दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे करीत आहेत.
युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार
अनिल चौधरी यांना गाडगेनगर पोलिसांनी अॅम्ब्यूलन्समध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. या ठिकाणी त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ प्रीती मोरे व इतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. विष जास्त घेतले नसले तरी ते अतिविषारी, घशाला चिकटणारे व मिडो कम्पाऊंड पद्धतीचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या चौधरी यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील ४८ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांनी चौधरी यांच्या मोबाइलच्या आधारे त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या नावाची खातरजमा केल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले.