अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 09:21 AM2017-11-22T09:21:54+5:302017-11-22T09:23:37+5:30

वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

farmer's suicide attempt in tehsil office of Amravati district | अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे‘मी लाभार्थी’चा बुरखा फाटला नांदगाव तहसील कार्यालयातील घटना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाद्वारा सर्वत्र नियमित गाजावाजा करण्यात येणाऱ्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती किती फसव्या आहेत, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली.
नरेंद्र रामचंद्र मुंदे (३२) यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि लोणीच्या ठाणेदारांना ६ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन कर्जमाफी मिळाली नसल्याने २१ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची प्रशासनाने दखलच घेतली नाही. नरेंद्र यांनी मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तहसीलमध्ये उपस्थितांनी प्रसंगवधान राखून अनर्थ टळला.
याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठाणेदार मगन मेहते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सहारे, नांदगाव व लोणी येथील पोलीस ताफा हजर होता. पोलिसांनी नरेंद्र मुंदे याला पोलीस ठाण्यात नेताच तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी पोलीस ठाण्यात जमा झाले. मात्र, त्यांना गेटवरच थोपविण्यात येऊन ठाणेदाराने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. यावेळी सचिन रिठे, विलास बोरकर, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, अमोल धवसे, इद्रिसभाई, विनोद मुंदे, गणेश मुंदे आदींनी शेतकऱ्यांची होत असलेल्या लुटीचा विषय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.


शेतकऱ्यांचे प्रसंगावधान
आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती राजना व परिसरातील काही शेतकऱ्यांना होती. नरेंद्र यांची परिस्थिती पाहता, ते आत्मघाती पाऊल उचलू शकतील, अशी शंका वाटल्याने काही शेतकरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
परिसरातील कोव्हळा, काजना, राजना, निमसवाडा, साखरा, पिंप्री निपाणी, सुकळी, धानोरा फसी व इतर गावांतील शेतकºयांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

कर्जाचा बोजा अन् वसुलीचा तगादा
मुंदे यांच्याकडे पाच एकच शेती आहे. त्यावर २०१४ मध्ये पापळ येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेतून साडेतीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे. सततच्या नापिकीमुळे व शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे कर्जाचा बोजा वाढतच राहिला. यंदाच्या हंगामातही अपुऱ्या पावसामुळे खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाले. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आणि शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्चही पिकातून काढणे कठीण झाले. वसुलीचा तगादा कायमच होता. कंटाळून हे पाऊल उचलले.


कर्जमाफीसाठीचे अर्ज प्रक्रियेत आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेतो. वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवितो.
- पीयूष सिंग
विभागीय आयुक्त, अमरावती

Web Title: farmer's suicide attempt in tehsil office of Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी