टाकरखेडा संभू परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:43+5:302021-09-17T04:16:43+5:30
पान २ बॉटम कृषिमंत्र्यांनी केली होती पाहणी, भातकुली तालुक्यात २०३५ हेक्टर क्षेत्र बाधित संतोष शेंडे - टाकरखेडा संभू ...
पान २ बॉटम
कृषिमंत्र्यांनी केली होती पाहणी, भातकुली तालुक्यात २०३५ हेक्टर क्षेत्र बाधित
संतोष शेंडे - टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात जुलैमध्ये टाकरखेडा संभू, साऊर, रामा या परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील २०३५ हेक्टर पिकाखालील क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाले. याची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली होती. परंतु, अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे.
भातकुली तालुक्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यात टाकरखेडा संभू, साऊर, रामा या परिसरात २०३५ हेक्टरवरील जमीन पाण्याखाली आली. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. टाकरखेडा संभू शिवारातील ९२० हेक्टर, साऊर परिसरात ८०५, रामा परिसरात ३१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या भागाची पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री यांनी टाकरखेडा संभू परिसरात दाखल होऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. परंतु, आज सुमारे दोन महिन्याच्या कालावधी लोटत असताना अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.