अर्ज करुनही शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:07 PM2024-05-17T13:07:57+5:302024-05-17T13:08:23+5:30
Amravati : नवीन कनेक्शनकडे दुर्लक्ष, वाढोणा रामनाथ परिसरातील शेती ओलितापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणा रामनाथ : शेतात विहीर आहे. काहींकडे बोअरवेल आहे. त्याला मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढविण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असली तरी वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.
काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु, नवीन वीज जोडणी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना देणे बंद करण्यात आल्याने पाणी असूनही ओलिताची पिके घेता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनकरिता महावितरणकडे अर्ज केला. परंतु, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाढोणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडवाले यांनी सन २०१६ मध्ये महावितरणकडे वीजपुरवठ्यासाठी ६२०० रुपयांचा भरणा केला होता. त्यांनी अनेक चकरा महावितरण कार्यालयाकडे मारल्या. परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. बागायती शेती करण्यापासून महावितरणने वंचित ठेवल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
सौरऊर्जेची सक्ती
शेतकऱ्यांनी शेतामध्ये सौरऊर्जाचलित वीजपुरवठा घेऊन ओलिताची शेती करावी, असा अलिखित नियम महावितरणकडे आहे. परंतु, माकडे व इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे सोलर पॅनलची तूटफूट होते आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हा पर्याय महागडा ठरत आहे. महावितरणकडे वीज जोडणीबाबत विचारणा केल्यास, सौरऊर्जा संयंत्रावर ९० टक्के अनुदान आहे, ते घ्या, असा धोशा लावला जात असल्याचे शेतकयांचे म्हणणे आहे.
३० ऑगस्ट २०२३ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांनाच वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जासाठी फंड नसल्यामुळे वीज पुरवठा करणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करावा.
- सुनील शिंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण