खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच
By admin | Published: June 19, 2015 12:41 AM2015-06-19T00:41:16+5:302015-06-19T00:41:16+5:30
मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, ....
कावली वसाड : मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, रबी पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आता शेती कशाच्या भरवशावर करावी, हा प्रश्न पडला आहे. तरीदेखील शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत. आज ना उद्या मार्ग सापडेल आणि खरिपाची पेरणी होईल, या आशेवर शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी पूर्णत: आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. शासनाचे धोरणही शेतकरीविरोधी असून व्यापारी आणि उद्योजकाच्या हिताचे असल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे.
हाडाचे पाणी करुन काबाडकष्ट करून तसेच उधार, उसणवारीने पैसे आणून मागील वर्षी पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाले नाही आणि उरल्या-सुरल्या मालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या कर्जाचीदेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. आता बी-बियाणे आणावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात खासगी सावकारांकडे धाव घेऊन व्याजाने पैसे आणल्याचे समजते.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खासगी अवैध सावकारही आहे. मात्र याची वाच्यता केली जात नाही. कारण आपल्या शेतीला पैसा दिला कोण्या संबंधाने, हे अधिकाऱ्याला किंवा सामाजिक काम करणाऱ्याला सांगितले तर आपले काम होणार नाही. त्यामुळे शेतकरी व्याजाच्या दरात मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याचे ग्रामीण भागाचे चित्र आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी उत्पन्न होते. परंतु भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर उत्पन्न कमी, पिकांची स्थिती चांगली तर निसर्ग साथ देत नाही, अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला वाट काढवी लागत आहे. त्यामुळे अवैध सावकारी कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कारण मागील उधारी परत न केल्याने यावर्षी कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ते संकटात आहेत.