केवायसी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजनेचे दोन हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:00 AM2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:01:01+5:30
केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या पीएम शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांना चार दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचे खाते या योजनेशी आधार लिंक, केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. आता याकरिता ३१ मार्च ही डेडलाईन देण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.
केंद्र शासनाद्वारा देण्यात येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी अनेक बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना ११वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच त्यांच्या बँक खात्यात आता दहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात साधारणपणे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
यानंतर एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता जमा होणार आहे. केंद्र शासनाने सन २०१९मध्ये ही योजना सुरू केली. यासाठी जिल्ह्यातील ३,३८,४४५ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र, अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण होणार आहे.
१० हप्ते बँकेत जमा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत १,११,२६८ शेतकऱ्यांना दोन हजाराचे प्रत्येकी १० हप्ते मिळाले. यात पहिला हप्ता ३,२२,८५८ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर खात्यांची पडताळणी झाल्याने अपात्र शेतकरी कमी होत गेले. या योजनेत ८,२१४ अपात्र शेतकऱ्यांना ५.५६ कोटींची मदत देण्यात आली आहे. ही रक्कम वसूलपात्र आहे. यामध्ये ७.७६ लाख आतापर्यंत वसूल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
कसे कराल केवायसी
मोबाईलवर पंतप्रधान किसान पोर्टल उघडून त्यावर फार्मर कॉर्नर पर्याय दिसेल, त्याखाली केवायसीवर क्लिक करा. ई-केवायसी डॅशबोर्ड दिसेल, तेथे आधार व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा व आलेला ओटीपी सबमिट करावा.
केवायसीसाठी ३१ मार्च डेडलाइन
या योजनेत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त आहेत. मात्र, अकराव्या हप्त्यापूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च ही डेडलाइन देण्यात आली आहे. शेतकरी आपल्या मोबाइलवरून किंवा सीएससी सेंटरवरून केवायसी करू शकतात.