१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 7, 2023 04:32 PM2023-06-07T16:32:46+5:302023-06-07T16:36:17+5:30
पीएम किसान सन्मान योजना; आातापर्यंत जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
अमरावती : शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेत असताना जिल्ह्यातील १७१४० शेतकऱ्यांची जमिनच रेकार्डवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोर्टलवर सध्या महसूल यंत्रणेद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची जमीनविषयक माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये हा प्रकार उघड झाला आहे.
याशिवाय पाच हजार नव्या खातेदारांनी योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. त्यांच्या शेतीची माहिती अद्याप पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २२ हजारावर शेतकऱ्यांची जमिनीची माहिती पोर्टलवर नसल्याने या शेतकऱ्यांना जून महिन्यात देण्यात येणारा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी दोन हजारांच्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही, याविषयी प्रशासनात शंका व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांनी आातापर्यंत नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३.०३ लाख शेतकऱ्यांची डेटा व्हॅलीडेशन झालेले आहे. याशिवाय योजनेसाठी २.४३ लाख खातेदारांची ई-केवायसी झालेली आहे. या सर्व खातेदारांना या महिन्यात केंद्रांचा १४ वा, राज्य शासनाचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. याशिवाय ६४ हजार खातेदारांनी ई-केवायसी केलेली नाही. ते खातेदार यापासून वंचित राहणार आहे.