नवरात्रीचा उपवास करताय! फळे खा, शाबूदाणा टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 04:56 PM2021-10-07T16:56:45+5:302021-10-07T17:11:52+5:30
नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा.
अमरावती : नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाची प्रथा आजही बहुतांश महिला, पुरुष पाळतात. अंबानगरीत जागृत अंबादेवीचे ठाण असल्याने नित्यनेमाने पहाटे पूजाअर्चा भाविक करतात. मात्र, उपवासात फळांचा आहार शरीराला साजेसा राहणार असल्याने शाबूदाना टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
अंबापुरी, अंबानगरी असे संबोधले जाणाऱ्या अमरावती शहरात जागृत अंबा, एकवीरादेवीचे मंदिर असल्याने नवरात्रोत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. विदर्भातील नागरिकांचे कुळदैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनाकरिता अत्यंत व्यस्त असलेले भाविक नवरात्रात आवर्जून येतात. त्यानिमित्ताने येथील यात्रेतून आठवण म्हणून खरेदी करतात. ही परंपरा आजही प्रचलित आहे.
दरम्यान, गाढ श्रद्धा असलेले भाविक नऊही दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. अनेकजण नऊ दिवस विना पादत्राने ठिकठिकाणी फरतात. मात्र, उपवासात शाबूदान्याचा वापर केल्यास ते पचायला जड जाते. त्यामुळे कमी खाणे, तेही पचनास सुकर असलेली फळे, भगर आदींचा वापर केल्यास शारीरिक व्याधी वाढण्यापासून रोखता येऊ शकते, असे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख यांनी सांगितले.
हे पदार्थ खाल्लेले बरे
उपवासात फळ, भाज्या व फळांचा रस सेवन करावे. शाबूदाणा खीर, भगर खीर यातून प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळते. आतील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे, असे आहारतज्ज्ञ रसिका राजनेकर यांनी सांगितले.
शाबूदाणा खाल्ल्याने काय त्रास होऊ शकतो?
शाबूदाणा हे अनेक प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे त्यापासून बनिवलेले विविध पदार्थ खान्यास बरे वाटत असले तरी ते पचनास त्रासदायक ठरतात. मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींना तो पचवताना जड जातो. पोट साफ होत नसल्याने व्याधी जडतात, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शरीर थकेल अशी कामे टाळावी
नवरात्राच्या या नऊ दिवसात उपवास करीत असल्याने नेहमीप्रमाणे काम करू नये. शरीत तेवढी कामे करण्याची ऊर्जा निर्माण होत नसल्याने थकवा येऊ शकतो. शरीर अस्वस्थामुळे भोवळ येणे, रक्तदाब कमी-अधिक होण्याचा प्रकार घडू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उपवासात शाबुदाणा खीर, भगर खीर, मिक्स सुकामेवा शेक, चिक्कीचे पदार्थ ड्रायफ्रुट, शेंगदाणा, राजगिरा, मखाना, भगर इडली, पनीर ग्रेव्ही, नारळ पाणी, शिंगाडा अप्पे यातून प्रोटीन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट मिळते. हे पदार्थ उपवासात खावे.
- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ