Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

By गणेश वासनिक | Published: September 24, 2022 04:58 PM2022-09-24T16:58:55+5:302022-09-24T17:13:34+5:30

श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना

Fatal accident in Amravati; Two students were blown over by the speeding truck, one seriously injured | Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

Next

तिवसा (अमरावती) :अमरावतीवरून नागपूरकडे समांतर वेगाने चालणाऱ्या दोन वाहनांपैकी ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने (एम एच ०४-एच.डी.९०५६) महामार्गालगत असलेल्या किराणा दुकानाला जबर धडक दिली. यावेळी लागूनच असलेल्या श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयातून कर्तव्य बजावून निघालेल्या व श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या  दुचाकीवर स्वार असलेल्या दोन विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता दरम्यान गुरूदेव नगर येथे महामार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलात सागर डेहणकर यांचे किराणा दुकान आहे. तसेच महासमाधीपासुन शंभर मीटरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झालेले नाही. त्यामुळे रहदारीने अतिशय गजबजलेल्या व अरुंद रस्त्यावरून नियमित भरधाव वाहतूक सुरू असते. अशातच अमरावतीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने किराणा दुकानाला जबर धडक दिली. सुदैवाने दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु त्याचवेळी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या व दुचाकीवर (एम.एच.३६-पी-४०७१) निघालेल्या भावेश नंदू जगनाळे (२१) रा. लाखनी जि. भंडारा व वैष्णवी सुधीर नार्लेवार( २१) रा. गोंडपिंपरी जि.चंद्रपुर या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रकखाली आली. त्यामुळे भावेश जगनाळे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारार्थ अमरावती येथे पाठविण्यात आले. तर वैष्णवी नार्लेवार या विद्यार्थीनीवर येथील आयुर्वेद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी दुचाकीसह ट्रकखाली अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांना सहकार्य केले.

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच ट्रकचालक बाळू राजेंद्र काळे (२६) रा. बेलपुरा अमरावती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन महिन्यांत चौथा अपघात

महामार्गावरील हे ठिकाण अपघातांचे प्रणव स्थळ झाले आहे.कारण येथे पादचारी रस्ताच नाही. व महामार्गालगत व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.तसेच याच मार्गावर आयुर्वेद रुग्णालय व शाळा महाविद्यालय असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.अशावेळी भरधाव येणाऱ्या वाहनांपासुन नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.त्यामुळे आबालवृद्धांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येथील महामार्गावर व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांना पार्किंगचे अजीबात भान नाही.त्यामुळे महामार्गावर अस्ताव्यस्त अवैध पार्किंग हा नित्याचाच विषय झाला आहे.काही हाॅटेल व्यावसायिकांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून चक्क महामार्गच पार्कींगसाठी वापरात घेतला आहे.परंतु एवढ्या गंभीर समस्येकडे पोलिस प्रशासन व महामार्ग निर्माण आय.आर.बी.कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलाची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हस्तांतरित केली असून संबंधितांना त्याचा मोबदला सुद्धा देण्यात आला आहे.परंतु व्यावसायिक त्याच जागेवर ठाण मांडून बसल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.जोपर्यंत येथील व्यापारी संकुले मोकळी करून पादचारी मार्ग तयार होत नाही तोपर्यंत अपघातांची श्रृंखला अशीच चालणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Web Title: Fatal accident in Amravati; Two students were blown over by the speeding truck, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.