घोेरपडींची विक्री रोखणाऱ्या पथकावर जीवघेणा हल्ला; एक जण जखमी, आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:19 AM2024-07-03T00:19:35+5:302024-07-03T00:24:36+5:30
वडाळी परिसरात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची विक्री पारधी समूहाकडून केली जाते. ती याच मोसमात खाण्यासाठी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण हेल्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.
मनीष तसरे -
अमरावती : शहरातील वडाळी परिसरात घोरपडींची राजरोस विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर समूहाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. तो परतवून लावत चार घोरपडी जप्त करण्यात आल्या तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा थरारक घटनाक्रम घडला.
वडाळी परिसरात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची विक्री पारधी समूहाकडून केली जाते. ती याच मोसमात खाण्यासाठी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण हेल्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे. या अवैध खरेदी-विक्रीच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी पाळतदेखील ठेवली. मंगळवारी येथील पारडी बेड्यावरील काही घरांमधून विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती संस्थेचे सदस्य शुभम गायकवाड, सुमीत गवई, सोनाली नवले व अभय मेटांगे यांनी मंगळवारी दुपारी वनविभागाला दिली.
सायंकाळच्या सुमारास वनविभागाने फ्रेजरपुरा पोलिसांचे सहकार्य घेत पारधी बेेड्यावर धाड टाकली. येथील एका घरातून चार घोरपडी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे बिथरलेल्या पारधी समूहाकडून पथकावर सशस्त्र हल्ला चढविण्यात आला. पावशीसारख्या शस्त्राचा यामध्ये वापर करण्यात आला.
यात योगेश सूर्यकांत धंदर व सागर सखाराम हागे हे जखमी झाले. वनविभागाच्या ताफ्यातील दुचाकीचेदेखील जमावाने नुकसान केले. आकस्मिक हल्ल्याने सैरभैर झालेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकाने सावरून पुन्हा कारवाईला प्रारंभ केला. घोरपडीची अवैध विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा पळून गेल्याची माहिती आहे. पुढील कार्यवाही वनविभाग करीत आहे.
वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल श्याम देशमुख, राहुल चव्हाण, प्रशांत खाडे, चंद्रकांत चोले, सुनील टोकले, फिरोज खान, अन्सार दर्गीवाले, हेमंत पांगरे, दिनेश धारपवार, विद्या बनसोड, अश्विनी जाधव, संदीप चौधरी यांच्यासह फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
वडाळी परिसर पारधीपुरा येथे घोरपडी विकण्यात येत असल्याची माहिती हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी दिली होती. त्यानुसार सायंकाळी पथकासह कार्यवाही करण्याकरीता गेलो असता, जमावाने हल्ला केला. यात दोन कर्मचारी जखमी झाले दुचाकीचे नुकसान झाले. या ठिकाणावरून चार घोरपडी जप्त करण्यात आल्या. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. - वर्षा हरणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी
पावसाळा हा घोरपडींसाठी विणीचा हंगाम असतो. घोरपडी गर्भवती असतात. याच काळात त्यांना खाण्याचे प्रचलन आहे. अनेक अंधश्रद्धांमुळे त्यांचा नाहक बळी जात आहे. त्यांची संख्या ही दिवसेंदिवस घटत चालली आहे.
- सुमीत गवई, सचिव, हेल्प फाउंडेशन