तिवसा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:00 PM2017-09-14T22:00:15+5:302017-09-14T22:00:34+5:30
शहरातून गेलेला अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत: दुर्लक्षित असून महामार्गावर जीवघेणे खोल खड्डे पडले आहे.
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शहरातून गेलेला अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत: दुर्लक्षित असून महामार्गावर जीवघेणे खोल खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून याची टोल वसुली नांदगाव पेठ नाक्यावर होत आहे. मात्र वाहनचालकांना सोई सुविधा मात्र मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे
२३ फेब्रुवारी रोजी तिवसा येथील टोल नाक्याचा करार संपला. त्यामुळे येथील वसुली करणारा नाका बंद झाला तेव्हापासून तिवसा शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग दुर्लक्षित आहे महामार्गावर खोल खोल जीवघेणे खड्डे पडले असून यामध्ये दुचाकी चालकासहित कारचालक खड्डे चुकवण्यासाठी कमालीची कसरतीने मार्ग काढत प्रवास करीत आहेत. त्यात रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच मागील मार्च महिन्यापासून महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्री महामार्गावर काळोख पहायला मिळतो. दुभाजकावर गांजर गवत वाढले आहे.
दुभाजकावरील मोठंमोठे झाडे वाढले असून ते झाडं आता रस्त्यावर येऊ लागले आहेत,या महामार्गावर विविध समस्या निर्माण झाल्या असून यावर कुणाचे नियंत्रण आहे, हा सवाल उपस्थित केला जात आहे. या महामार्गावरील वसुली नांदगाव पेठ नाक्यावर होत असून सुविधा मात्र अजिबात मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे