दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:23+5:302021-07-28T04:13:23+5:30
दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने ...
दोन हजार ७२४ जण घेतात लाभ; २६ केंद्रांवरून सेवा
अमरावती : कुणीही उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंत ही केंद्रे सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज १० ते १५ जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.
कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यात मजूर, कामगार, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतून दररोज दोन हजार ७२४ लोकांना जेवण दिले जाते. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा राहत असतात. त्यातील गोरगरीब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते. त्यातही थाळींची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या वाढविण्याची गरज आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - २६
रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - २७२४
शहरातील शिवभोजन थाळी केंद्रे - ०५
शहरात रोज असलेल्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - १२९०
बॉक्स
पीडीएमसी रुग्णालय केंद्र
डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेक जण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे तेथील केंद्रावरील थाळी लवकर संपत असते. या केंद्रावर दिलेल्या वेळेनंतर आल्यास अनेक जण परत जातात.
बस स्थानक केंद्र
शहरात कामानिमित्त अनेक जण येत असतात. बसस्थानकात केंद्र असल्याने अनेक जण या केंद्रात जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच थाळीची मागणी अधिक असते. आजघडीला शासनाच्या सूचनेप्रमाणे मोफत जेवण दिले जात आहे. परिणामी मागणी अधिक असल्याने थाळी लवकरच संपते. त्यामुळे साधारणता १० ते १५ जण परत जातात.
बॉक्स
रोज २७२४ जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?
जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांचा लाभ २७२४ जण घेत असतात. वेळेनंतर गेल्यास अनेक केंद्रांवर बऱ्याचदा थाळी भेटत नाही. परिणामी आल्या पावली परत यावे लागते. एका केंद्रावर १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्रांची संख्या तसेच थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.