बाप रे बाप, मोर्शीत आढळला 18 सेमी लांबीचा 'खापरखवल्या' साप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:51 PM2018-12-13T16:51:10+5:302018-12-13T16:53:12+5:30
खापरखवल्या : 12 वर्षांनंतर झाली दुसरी नोंद
मोर्शी (अमरावती) : अतिशय दुर्मीळ समजला जाणारा खापरखवल्या साप सालबर्डीलगत रस्त्याच्या कडेला रविवारी सर्पमित्रांना आढळला. इलिओट्स शिल्डटेल प्रजातीच्या या सापाला हेल्प फाऊंडेशनचे संकेत राजूरकर, शुभम गायकवाड, प्रज्ज्वल वर्मा यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले असून, 2006 नंतर अमरावती जिल्ह्यात या सापाची अवघी दुसरी नोंद झाली आहे.
खापरखवल्या हा 18 सेमी लांबीचा सर्वात लहान साप असून, सातपुडा पर्वतरांगेत त्याचे वास्तव्य असल्याची नोंद ‘स्नेक्स ऑफ इंडिया’ या मिलिंदकुमार खैरे यांच्या पुस्तकात आहे. पावसाळ्यातच जमिनीबाहेर येणारा हा साप वर्षभर जमिनीत वास्तव्य करतो. गांडूळ हे त्याचे मुख्य खाद्य आहे. या सापाला हिवाळ्यात बाहेर बघून सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.
सर्पमित्र रत्नदीप वानखडे यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्या सापाच्या मानेवरील, पाठीवरील, व शेपटीच्या भागाची स्केलने तंतोतंत मोजमाप केले व हा साप इलिओट्स शिल्डटेल प्रजातीचा असल्याची खातरजमा केली. रात्रीची वेळी असल्याने त्याला अमरावतीपर्यंत आणणे शक्य नव्हते. अखेर त्या सापाला सुरक्षितरीत्या जंगलात सोडण्यात आल्याची माहिती हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांनी दिली.
अशी आहे ओळख
इलिओट्स शिल्डटेल या सापाची लांबी 18 सेंमी, डोळे खूप बारीक, तर शरीराच्या मानाने तोंड लहान व निमुळते असते. त्याच्या पोटावर पिवळे ठिपके व शेपटी आखूड व त्यावर एकूण 17 खवले खरबड किंवा घासल्याप्रमाणे दिसतात. या सापावर संशोधन झाले नसल्याने त्याची इंटरनेटवरसुद्धा अल्प माहिती आहे.
खापरखवल्या साप दुर्मीळच आहे. परंतु त्याचा सातपुडा पर्वत रांगेत चिखलदरा येथे 13 ऑगस्ट 2006 रोजी प्रथम नोंद झाली आहे.
- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती