विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू! धानोरा पूर्णा येथील घटना, रंगकाम करताना ओढवला मृत्यू
By गणेश वासनिक | Published: October 16, 2022 06:41 PM2022-10-16T18:41:37+5:302022-10-16T18:41:53+5:30
अमरावतीतील बेलोरा येथे विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू झाला आहे.
बेलोरा (अमरावती) : रंगकाम करीत असलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा पूर्णा येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, बाबुराव दामोदारराव भालेराव (६०) व चेतन बाबूराव भालेराव (२४) अशी मृतांची नावे आहेत. भालेराव कुटुंबात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराला रंगविण्याचे काम चेतन करीत होता. त्याकरिता लोखंडी शिडीवर तो चढला होता. समोरून गेलेल्या केबलला स्पर्श होताच त्याच्या शरीरात वीजप्रवाहाचा संचार झाला. वापरत असलेल्या लोखंडी शिडीतही विद्युत प्रवाह आला. त्यामुळे तो जागीच थरथरत होता.
दरम्यान, बाबूराव भालेराव यांना हे दृश्य दिसले. वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने चेतन थरथरत आहे, हे त्यांना कळले नाही. अतिशय त्वरेने त्यांनी शिडीला हात लावला. त्याच क्षणाला त्यांच्याही शरीरात वीजप्रवाहाचा संचार झाले. चेतनच्या भावाला हा प्रकार लक्षात येताच त्याने केबल तोडून वीज प्रवाह खंडित केला. मात्र, तोपर्यंत चेतनचा जागीच मृत्यू झाला होता. बाबुराव भालेराव यांना प्रथम आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र ते बंद होते. त्यामुळे त्यांना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तसेच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चेतनसह त्यांचे पार्थिव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले. येथे त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर आसेगाव पूर्णा पोलिसात प्रकरण दाखल झालेले नव्हते.