शिरजगावच्या संत्रा व्यापारी पिता-पुत्राचा वणी-यवतमाळ मार्गावर अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:13+5:302021-04-19T04:12:13+5:30
फोटो - १८एएमपीएच१५ - अपघातग्रस्त कार डुलकीने केला घात, रात्रभर केले ड्रायव्हिंग, चालकही दगावला शिरजगाव कसबा (अमरावती) : ...
फोटो - १८एएमपीएच१५ - अपघातग्रस्त कार
डुलकीने केला घात, रात्रभर केले ड्रायव्हिंग, चालकही दगावला
शिरजगाव कसबा (अमरावती) : चांदूर बाजार तात्क्यातील शिरसगाव कसबा येथील संत्रा व्यापाऱ्याच्या वाहनाला वणी-यवतमाळ मार्गावर अपघात झाला. यात त्यांच्यासह मुलगा व चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्रभर ड्रायव्हिंग केल्यानंतर पहाटेच्या सुमारास लागलेली डुलकी अपघातास कारणीभूत ठरली. पोलीस सूत्रांनुसार, शिरजगावातील फ्रुट मर्चंट मोहम्मद सलीम हे संत्राबागांच्या व्यवसायानिमित्त आंध्र प्रदेशमधील वारंगल येथून एमएच ४० केआर ७३२५ क्रमांकाच्या कारने परत येत होते. वणी-यवतमाळ रोडवर पारवा गावानजीक पहाटे ५ च्या सुमारास चालक लखन याला डुलकी लागली आणि भरधाव असलेली कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. तो रात्रभर कार चालवित होता, अशी माहिती पुढे आली आहे. हा अपघात इतका भीषण होता, कारचा समोरील इंजनचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला होता.
अपघाताच्या वेळी कारमध्ये चौघे होते. यापैकी मोहम्मद सलीम (६५), त्यांचा धाकटा मुलगा आसीम सिमाब (३०) व कारचालक लखन शेमालकर (३२, रा. धारणी) यांचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद सलीम यांचा मोठा मुलगा शादाब सिमाब (३५) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी व मृतांना यवतमाळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.
-------------
आसीमचा झाला होता साखरपुडा
मोहम्मद सलीम व त्यांचा मुलगा आसिफ सीमाब हे मनमिळावू व यामुळे गावात सुपरिचित होते. त्यांचा धाकटा मुलगा आसीम सीमाब याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. कुटुंबातील कर्ती व्यक्ती निघून गेल्याने कुटुंब सैरभैर झाले आहे.