पुत्राच्या विरहात पित्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2023 20:09 IST2023-02-24T20:08:45+5:302023-02-24T20:09:08+5:30
Amravati News आठ दिवसांपूर्वी अडीच वर्षीय बालकाचा विजेच्या शॉक लागल्याने घरीच मृत्यू झाला. पुत्राच्या विरहात व्याकूळ झालेल्या पित्याने शुक्रवारी दुपारच्या वेळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुत्राच्या विरहात पित्याची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती: आठ दिवसांपूर्वी अडीच वर्षीय बालकाचा विजेच्या शॉक लागल्याने घरीच मृत्यू झाला. पुत्राच्या विरहात व्याकूळ झालेल्या पित्याने शुक्रवारी दुपारच्या वेळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मांगरुळी पेठ येथील ब्राह्मणे परिवारात घडली. आठ दिवसांमध्ये पुत्रापाठोपाठ पिता गेल्याने ब्राह्मणे परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे.
किशोर रामराव ब्राह्मणे (३८, रा.मांगरुळी पेठ) असे मृत पित्याचे नाव आहे. त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा सम्राट याचा १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६च्या सुमारास घरी टीव्ही पाहत असताना जिवंत वायर हाताला लागल्याने जागीच मृत्यू झाला. सम्राट वडिलांचा प्रिय असल्याने, पिता-पुत्राचे एकमेकांवर जिवापाड प्रेम असल्याने पिता किशोर पुत्रवियोगात होते. पोटचा गोळा गेल्याचे अतिव दुःख झाल्याने चिंताग्रस्त झाले होते. मोलमजुरी करणाऱ्या ब्राह्मणे परिवारावर दुःखाचे सावट होते. याच भावविश्वात २३ फेब्रुवारीला पित्याने घरी कुणी नसल्याचे पाहून राहत्या घरी दुपारच्या दोन वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यावेळी पत्नी प्रीती, मुलगी आणि मुलगा शाळेत कार्यक्रमाला गेले होते. घरी आल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत पती दिसल्याने एक खळबळ माजली. पत्नी आणि भावांनी, तसेच शेजाऱ्यांनी मृत किशोरला ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. आठ दिवसांत बापलेकाच्या मृत्यूने ब्राह्मणे परिवारासह मांगरुळीमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.