मुलानंतर वडिलांचाही मृत्यू, आई गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:11+5:302021-08-29T04:16:11+5:30
चिखलदरा : तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा झाली. त्यात शुक्रवारी पहाटे ५ वाजता सात वर्षीय मुलाचा ...
चिखलदरा : तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील दहा जणांना विषबाधा झाली. त्यात शुक्रवारी पहाटे ५ वाजता सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हा रुग्णालयात शनिवारी वडिलाने अखेरचा श्वास घेतला, तर आई गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल आहे. हे प्रकरण पोलिसांकडे तपासणीसाठी देणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याच गावातील सात बालकांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे
बुधराज दमड्या बछले (३५, रा. डोमा) असे शनिवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पत्नी लक्ष्मी बछले (३०) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आयुष बुधराज बछले (७) याचा मृत्यू झाला. यापूर्वी या तिघांसह मुलगी रिया (१७), मुलगा निखिल (८), दमड्या बछले (५५), त्याची पत्नी नानू दमड्या बछले (५२) व पिंटू तुकाराम सेमलकर (सर्व रा. डोमा) यांना अतिसार झाला. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात रागेश्री माहुलकर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार करून चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. बुधराज व पत्नी लक्ष्मी यांना गंभीर आजारी झाल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी पाठविण्यात आले. त्यात शनिवारी बुधराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबातील उर्वरित सदस्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
बॉक्स
तपास पोलिसांकडे देणार
घटनेचा तपास पोलिसांना सोपविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शुक्रवारी जिल्हास्तरावरून डॉक्टरांच्या साथरोग चमूने गावातील पाण्यासह इतर ठिकाणी तपासणी केली. मात्र, काहीच आढळून आले नाही.
बॉक्स
विषारी बिया खाल्ल्याने सात बालकांना विषबाधा
डोमा गावात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने नीलम झारखंडे (१३), दुर्गा झारखंडे (६), अमृता बछले (५), दीक्षा झारखंडे (७), राजू झारखंडे (९), शिवानी झारखंडे (६) व दुर्गा पंचम झारखंडे (१३) या बालकांना विषबाधा झाल्याने शुक्रवारी चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी साहेबलाल धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले
कोट
डोमा येथील बुधराज बछले यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची पत्नी लक्ष्मी बछले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती